लोकसहभागातून झाले २७१ वर्गखोल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:46 PM2017-11-17T23:46:36+5:302017-11-17T23:46:55+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा स्पर्धेत सरस ठरावा त्याला माहिती व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे.
आयटी शिक्षणाचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा स्पर्धेत सरस ठरावा त्याला माहिती व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्यरत आहे. सातही तालुक्यात लोकसहभाग व सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या ४२० शाळा डिजिटल करण्यात आले आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षणाचे धडे मिळत आहे. २७१ वर्गखोल्या या लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत, हे विशेष.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावे. जबाबदार नागरिक होण्यासाठी तो सक्षमपणे शिकावा व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल वर्गखोल्यांची संकल्पना मांडण्यात आली. यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रगत शाळा व डिजीटल वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४२० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल वर्गखोल्या कार्यरत आहेत. यात ९९ शाळांमधील वर्गखोल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून, ४९ वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानातून तर उर्वरित २७१ वर्गखोल्या लोकसहभागातून डिजीटल करण्यात आले आहेत. या वर्गखोल्यांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, एलसीडी टी.व्ही. व इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे हसतखेळत व चलचित्र बघत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जातो.
जिल्ह्यातील भंडारा तालुक्यात ६२ डिजीटल शाळा, मोहाडी तालुक्यात ५९, तुमसर तालुक्यात ७७, साकोली तालुक्यात ४४, पवनी तालुक्यात ५८, लाखनी तालुक्यात ८० व लाखांदूर तालुक्यात ४० अशा एकूण ४२० शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. याविशाय भंडारा तालुक्यातील १२८ शाळा, मोहाडी तालुक्यात ८९, तुमसर तालुक्यात ९३, साकोली तालुक्यात ९४, पवनी तालुक्यात १२०, लाखनी तालुक्यात ८९ व लाखांदूर तालुक्यात ८० अशा एकूण ६९३ शाळा प्रगत शाळा म्हणून नावारूपास आल्या आहेत. काही शाळा प्रगत व डिजीटल अशा दोन्ही प्रकारात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील उर्वरित जिल्हा परिषद शाळा जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून डिजीटल व प्रगत करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. या टिमच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा आलेख उंचाविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.