गौण खनिजाच्या कारवाईतून २.७८ कोटींची वसुली

By admin | Published: February 5, 2017 12:16 AM2017-02-05T00:16:45+5:302017-02-05T00:16:45+5:30

रेतीघाटातून रेतीसह गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या वाहतुकदारांवर कारवाई केली जाते.

2.78 crore recovery from minor minerals | गौण खनिजाच्या कारवाईतून २.७८ कोटींची वसुली

गौण खनिजाच्या कारवाईतून २.७८ कोटींची वसुली

Next

तरीही जिल्ह्यात रेती तस्करी सुरूच : सर्वाधिक गुन्ह्याची नोंद मोहाडीत
राजू बांते मोहाडी
रेतीघाटातून रेतीसह गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या वाहतुकदारांवर कारवाई केली जाते. या कारवाईतून एप्रिल २०१६ ते १ फेब्रुवारी २०१७ पर्यंत दोन कोटी ७८ लाख ७३,९२६ रूपये वसूल करण्यात आले. आजपर्यंत अवैध गौण खनीज वाहतुकदारांवर ९७ गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात मोहाडी तालुका अव्वल ठरला आहे.
भंडारा जिल्ह्यात विविध घाटावरून चोरीने रेती काढली जाते. इतर गौण खनिजाची अवैधपणे वाहतुक केली जाते. रेती व गौण खनिजातून शासनाचा महसूल बुडत आहे. रेती व गौण खनिजांच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासाठी चौक्या लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा चालक महसूल विभाग व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. या पसार होण्यात महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांचे संगनमत असते. तरीही महसूल विभागाच्या लक्षांकपूर्तीसाठी अवैध रेती व गौण खनिज संपत्ती वाहतूक करणाऱ्यांना पकडून वसूली केली जाते. अशा या अवैध रेती व इतर गौण खनिज नेणऱ्या वाहतुकदारांकडून एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ पर्यंत २ कोटी ७८ लक्ष ७३ हजार ९२६ रूपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहे.
३ फेब्रुवारी अखेरपर्यंत सात तालुके व जिल्हा खनिज शाखा यांनी रेती व इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर केलेल्या कारवाईचे १०९९ प्रकरणे आहेत. सर्वाधिक प्रकरणे मोहाडी तहसिलचे आहेत. यात भंडारा १६८, पवनी १४२, मोहाडी २०९, तुमसर १५९, लाखनी ७८, लाखांदूर १७५, साकोली १५० व जिल्हा खनीज शाखा १८ अशी नोंद आहे. २ फेब्रुवारीपर्यंत ९७ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ४२ गुन्हा नोंद प्रकरणाची नोंद एकट्या मोहाडीत करण्यात आली आहे. भंडारा येथे ८, पवनी ३९, तुमसर ५, लाखांदूर २ व प्रत्येकी एक लाखनी व साकोली येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जिल्हा खनिज शाखेने एकही गुन्ह्याची नोंद केली नाही. चेक पोस्टवर पवनी येथे ११९, भंडारा ६६, मोहाडी २३ व तुमसर येथे ३७ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात एकही वाहनांची तपासणी करण्यात आली नाही. आजपर्यंत रेती व इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर केलेल्या कारवाईबाबत तालुकानिहाय विवरणानुसार झालेल्या वसुलीबाबत क्रमांक एकवर जिल्हा खनिज शाखा अव्वल आहे. जिल्हा खनीज शाखेने ८७ लाख ९९,५५० रूपये वसूल केले आहे. भंडारा तालुका ४४ लाख ४७,८०० रूपये, पवनी ४६ लाख ७९,०५३, मोहाडी ३९ लाख ३९,८५१, तुमसर २८ लाख ९३,८१२, लाखनी ६६ लाख ५,५६०, लाखांदूर १२ लाख १३,४००, साकोली १२ लाख ३४ हजार ९०० रूपये असे दोन कोटी ७८ लाख ७३ हजार ९२६ रूपये अवैध रेती व गौण खनिज वाहतुकदारांकडून वसूल करण्यात आले.
मोहाडीत ४१,६०० वसुली
अवैध वाहतूक करणारे रेतीचे नेरी येथे सकाळी तीन ट्रॅक्टर तहसिलदार धनंजय देशमुख यांनी पकडले. यातून ४१ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: 2.78 crore recovery from minor minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.