दोन महिन्यांत 86 अपघातात 28 मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 05:00 AM2022-03-27T05:00:00+5:302022-03-27T05:00:14+5:30
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या ८६ अपघातांत २८ जणांचा बळी गेला असून, ९८ जण गंभीर जखमी झाले आहे. एसटीच्या संपानंतर अपघातात वाढ झाल्याचे दिसत असून, सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे आहेत.
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग आणि जिल्हा मार्ग आहे. रस्ते सुस्थितीत असले तरी अलीकडील काही वर्षात अपघाताचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच एसटीच्या संपामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अपघात भंडारा, मोहाडी आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी महिन्यात अपघातात वाढ झाल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी महिन्यात ५१ अपघात होऊन १८ जणांचा मृत्यू, तर ६१ जण जखमी झाले होते. गतवर्षी जानेवारी महिन्यात ४२ अपघातांत १५ जणांचा मृत्यू, तर ३६ व्यक्ती जखमी झाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ३५ अपघातात दहा जणांचा मृत्यू, तर ३७ जण गंभीर जखमी झाले होते. गतवर्षी याच महिन्यात ३६ अपघातांत २० जणांचा बळी गेला, तर ४७ व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे होय. वारंवार जनजागृती करूनही नागरिक नियम पायदळी तुडवितात आणि अपघात घडतात.
भंडारा ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक अपघात
- गत दोन महिन्यांत सर्वाधिक १६ अपघात भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या. त्यात तिघांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. मोहाडी ठाण्यांतर्गत पाच अपघातात आठ जण जखमी झाले. कारधा ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात चार जणांचा मृत्यू आणि २९ व्यक्ती घायल झाले. वरठी ठाण्याच्या हद्दीत पाच अपघातात एका जणाचा मृत्यू, तुमसर ठाण्याच्या हद्दीत दहा अपघातात एकाचा मृत्यू, तर दहा जण गंभीर जखमी झाले. साकोली ठाण्याच्या हद्दीत १५ अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.
सर्वाधिक अपघात दुचाकीचे
- जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे झाले आहे. एसटीच्या संपामुळे पर्याय नसल्याने अनेक जण बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात. मात्र नियमांचे पालन करीत नाही. मद्य प्राशन करून दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, धोकादायक ओव्हरटेक करणे या कारणांमुळे अपघात झाल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी सांगितले.