१८३ शाळांमधील २८३ वर्गखोल्या धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 02:17 PM2024-07-08T14:17:45+5:302024-07-08T14:19:27+5:30

Bhandara : यशस्वीच्या मृत्यूने आणलं भयानक वास्तव समोर

283 classrooms in 183 schools are dangerous | १८३ शाळांमधील २८३ वर्गखोल्या धोकादायक

283 classrooms in 183 schools are dangerous

लाखांदूर : तालुक्यातील पुयार स्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यशस्वी राऊत या चिमुकलीचा विद्युत शॉक लागून जीव गेला. प्राथमिक शाळांमधील वास्तव यानिमित्ताने समोर आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७९४ प्राथमिक शाळांपैकी १८३ शाळांमधील २८३ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहे.


हजारो शिक्षक व लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आला काय? असा प्रश्न पालकगण या घटनेनंतर उपस्थित करीत आहे. अशा स्थितीत येथील बालके अध्यापन करीत आहेत. यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली तरी ती त्वरित अंमलबजावणीत यावीत, अशी पालकांची मागणी आहे.


लाखांदूर तालुक्याच्या पुयार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या यशस्वी सोपान राऊत या चिमुकलीचा विद्युत प्रवाहाने जागीच मृत्यू झाला होता. शाळा सुरू होण्याच्या तिसऱ्याच दिवशी या चिमुकलीचा अंत पाहून अनेकांचे डोळे पाणावले. 


फुलासारखी यशस्वी डोळ्यादेखत गतप्राण झाली, यशस्वीच्या पालकांच्या काळजाचा तुकडाच नियतीने हिरावला. चिमुकल्या यशस्वीचा काय दोष होता, शाळा कार्यप्रणालीच्या दोषाची ती बळी ठरली काय? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती शिक्षण विभागावर झाली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती काय यावर चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भौतिक सुविधा खरंच विद्यार्थ्यांना मिळताहेत का? त्यांची सुरक्षा खरंच होतेय का? असे अनेक नानाविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले. पुयारच्या घटनेनंतर शिक्षण विभाग सरसावला असला तरी फुलासारखी 'यशस्वी' आता परत येऊ शकत नाही. तिच्या अशा दुर्देवी मृत्यूने प्रशासनाचे डोळे उघडले गेले.


वार्षिक निधीतून १३ कोटींची तरतूद
माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण ७९४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमधील १८३ मधील २८३ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. या खोल्या निर्लेखित करून त्यांचे नवीन बांधकाम करण्याची गरज आहे, जीर्ण झालेल्या २८३ वर्ग खोल्यांच्या जागी बांधकाम करण्यासाठी जिल्हा वार्षिक विकास निधी अंतर्गत १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रत्येक बांधकामामागे १२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. चालू सत्रात या वर्ग खोल्यांचे बांधकाम होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. होणारा धोका लक्षात घेऊन वर्गखोल्यांचे बांधकाम प्राधान्य क्रमाने करून अन्य भौतिक सुविधांतर्गत शुद्ध पाणी, क्रीडांगण, संतुलित पोषण आहार यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून दुसरी कुणी यशस्वी' अव्यवस्थेचा बळी ठरू नये.


"जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतर्गत धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांच्या बांधकाम संदर्भात जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी देण्यात येणार आहे. त्या संबंधाने कारवाई सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशांतर्गत शैक्षणिक गरजा निश्चिती समितीमार्फत शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जात आहे."
- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भंडारा
 

Web Title: 283 classrooms in 183 schools are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.