मनरेगा अंतर्गत २८.४१ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती
By युवराज गोमास | Published: October 29, 2023 03:12 PM2023-10-29T15:12:10+5:302023-10-29T15:12:47+5:30
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे २८ लाख ४१ हजार रोजगार निर्मितीचा हेतू साध्य झाला असून टक्केवारी ७५.७६ इतकी राहिली.
भंडारा : जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे ३७ लाख ५० हजार मनुष्यबळ रोजगार निर्मितीचे लक्ष्यांक होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे २८ लाख ४१ हजार रोजगार निर्मितीचा हेतू साध्य झाला असून टक्केवारी ७५.७६ इतकी राहिली. उर्वरित ९ लाख ९ हजार रोजगार निर्मिती लवकरच पूर्ण करण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. यामुळे अकुशल व कुशल मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले.
'मागेल त्याला काम व कामानुसार दाम', हे ब्रीद वाक्य असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत भंडारा, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पवनी, साकोली, तुमसर तालुक्यात एकूण ५७२६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी १४५१ कामे पूर्ण करण्यात आली तर ४२७२ कामे प्रगतीपथावर आहेत. मग्रोरोहयोत समान कामासाठी समान वेतन दिले जाते. शासनाच्या निर्णयामुळे सरळ बँक खात्यात मजुरी जमा होते. त्यामुळे रोजगार हमी, अर्धे आम्ही व अर्धे तुम्ही या प्रकाराला मोठ्या प्रमाणात चाप बसली आहे. गत वर्षापासून थेट कामावर फोटोसह हजेरी घेतली जात असल्याने पारदर्शकता वाढली आहे. कामाच्या मोजमापानुसार दाम निर्धारित होत असल्याने रोहयोप्रती विश्वसनीयता वाढली आहे.
रोहयो अंतर्गत जिल्ह्यात अकुशल कामावर ५२८९.५९ लाख रुपयांचा तर कुशल कामांवर १४६४.७२ लाखांचा खर्च करण्यात आला. मनुष्यबळ रोजगार निर्मितीत मोहाडी तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला तर दुसऱ्या क्रमांकावर साकोली तालुका राहिला.
अकुशल व कुशल कामांवरील खर्च (लाखांत)
तालुका अकुशल कुशल
भंडारा ४८८.७२ १०१,३३
लाखांदूर ८१२.०८ २७८.८
लाखनी ७३४.५२ १९३.९७
मोहाडी १०८७.२४ ३२७.२८
पवनी ४९६.६८ ९२.४९
साकोली ९८२.४२ ४०१.७९
तुमसर ६७७.९४ ७३.०६
एकूण ५२८९.५९ १४६४.७२
जिल्ह्यात झालेली विविध कामे
भंडारा जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सात तालुक्यात तलावातील गाळ काढणे, नाला सरळीकरण, नाला खोलीकरण, मजगी-भात खचरे, सिंचन विहीर, वृक्ष व फळबाग लागवड, मातोश्री पाणंद रस्ते, स्मशानभूमी सौदर्यीकरण, शेळी शेड व गुरांचे गोठे बांधकाम, शेततळ बांधकाम आदींचा समावेश आहे. झालेल्या कामांमुळे नवनिर्मितीला चालना मिळाली व मजुरांच्या हाताला काम मिळाले.
मग्रारोहयो मनुष्यबळ निर्मिती (आकडे लाखात)
तालुका उद्दिष्ट साध्य टक्केवारी
भंडारा ३.६१ २.५९ ७१.७५
लाखांदूर ४.७५ ३.६१ ७६.००
लाखनी ५.३२ ४.४७ ८४.०२
मोहाडी ९.३२ ६.७० ७१.८९
पवनी ३.५८ २.१८ ६०.८९
साकोली ४.९१ ५.४४ ११०.७९
तमसर ६.०१ ३.४२ ५६.९१
एकूण ३७.५० २८.४१ ७५.७६