२९ बैलांची सुटका, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:08 PM2019-03-26T22:08:16+5:302019-03-26T22:08:39+5:30
जनावर तस्करी विरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील आंबागड येथे पोलिसांनी तीन वाहनातून तब्बल २९ बैलांची सुटका करुन तिघांना अटक केली. यावेळी ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जनावर तस्करी विरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील आंबागड येथे पोलिसांनी तीन वाहनातून तब्बल २९ बैलांची सुटका करुन तिघांना अटक केली. यावेळी ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
जनावरांची तीन वाहनातून तस्करी होत असल्याची माहिती आंधळगाव पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी आंबागड रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु केली. एका मागोमाग एक तीन वाहने येताच त्यांना थांबवून तपासणी केली. यात तब्बल २९ बैल आढळून आले. पोलिसांनी वाहनचालक आबीद अख्तर अन्सारी (२५) रा.कामठी, इम्रान युनूस शेख (३१) रा.कामठी तसेच गफूर कलीम अब्दुल पठाण (३१) रा.कामठी यांना ताब्यात घेतले. ही जनावरे दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी जात असल्याचे पुढे आले. या सर्व जनावरांची रवानगी पिंपळगाव खैरी येथील सुकृत गौशाळेत करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, सहाय्यक फौजदार संतोषसिंह सोलंकी, नंदेश्वर धुर्वे, युवराज चव्हाण, सचिन नारनवरे यांनी केली.