शेतकऱ्यांना ६८ कोटींचा पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:08 AM2019-08-15T01:08:47+5:302019-08-15T01:09:20+5:30
अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात रोवणी न होऊ शकलेल्या एक लाख ६३ हजार ७४ धान उत्पादक शेतकºयांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पंतप्रधान पीक विमा योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शेतकरी प्रतिनिधी व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शासन निर्णयाप्रमाणे जोखिमेबाबत प्रातिनिधीक सुचकांच्या आधारे अधिसूचित विमा क्षेत्र व पीक निहाय सरासरी क्षेत्र याबाबतची जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली. जिल्ह्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे सरासरी २५ टक्क्याच्यावर रोवणी झाले नसल्याचे या बैठकीत एकमताने ठरले.
यावर सासरी पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर रोवणी होवू न शकलेले अधिसूचित विमा क्षेत्र घटक नुकसान भरपाईस पात्र राहिले, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याअनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी विमा लाभास पात्र आहे. कर्जदार सभासद एक लाख ३७ हजार ६२४, क्षेत्र ६० हजार ८१३ हेक्टर, बिगर कर्जदार सभासद २५ हजार ४५०, क्षेत्र १४ हजार ४३७ असे एकूण एक लाख ६३ हजार ७४ सभासद, ७५ हजार ४४० हेक्टर विमाक्षेत्र असणारा या सभासदांना विमा कंपनीने ६८ कोटी ३५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
दहा वर्षात पहिल्यांदाच अशी अवस्था
कृषी विभागाच्या अहवालानुसार गत दहा वर्षात रोवणीची स्थिती पहिल्यांदाच झाली आहे. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोवण्या होऊ शकल्या नाही. त्यांना आता पीक विम्याची मदत मिळेल.