जलतरणसाठी ३०० स्पर्धक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:41+5:30
नाना पटोले म्हणाले, पोहण्यामुळे शरीरातील व्याधी दूर होऊन नवीन उत्साह संचारतो. पंजाब राज्यात क्रीडा खेळांना खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रातही विविध खेळांच्या माध्यमातून युवकांना संधी प्राप्त करून देण्यात येईल असे सांगून जलतरण पटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील शिवणीबांध येथे रविवारी आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांमधून ३०० च्या वर स्पर्धकांनी हजेरी लावली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवित तरुणांचा उत्साह वाढविला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुनील फुंडे, डॉ.चंद्रशेखर पाखमोडे, सदाशिव वलथरे, सरपंच वैशाली चांदेवार, राजेश बांते आदी मान्यवर उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, पोहण्यामुळे शरीरातील व्याधी दूर होऊन नवीन उत्साह संचारतो. पंजाब राज्यात क्रीडा खेळांना खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रातही विविध खेळांच्या माध्यमातून युवकांना संधी प्राप्त करून देण्यात येईल असे सांगून जलतरण पटूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.
या स्पर्धेसाठी राज्यभरातील जवळपास ३०० पेक्षा जास्त जलतरणपटू उपस्थित झाले. शिवणीबांधच्या निसर्गरम्य तलावात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे विदर्भात फक्त शिवणीबांध येथेच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली जाते. सदर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित अन्य अतिथींनीही जलतरणपटूंना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांनी तर संचालन अॅड.मनीष कापगते यांनी केले.