उस दर वाढीसाठी ३०० शेतकरी धडकले साखर कारखान्यावर; ...तर कारखान्याला उस न देण्याचा निर्धार
By युवराज गोमास | Published: October 26, 2023 03:14 PM2023-10-26T15:14:50+5:302023-10-26T15:15:28+5:30
दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
भंडारा : जिल्ह्यातील देव्हाडा स्थित एकमेव मानस ॲग्रो साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला २१०० रूपये प्रति मेट्रीक टन भाव जाहिर केल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांत असंतोषाची भावना होती. २५ ऑक्टाेंबर रोजी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यावर आक्रोश मोर्चा काढला. मात्र, कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी समाधानकारक न करता काढता पाय घेतल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते. दरम्यान भाव वाढ न दिल्यास कारखान्याला उस न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील मानस ॲग्रो साखर कारखान्यावर ऊस दर वाढ मागणीसाठी ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. कारखाना गेटवर आंदोलक शेतकरी दिवसभर ठिय्या मांडून होते. कारखाना प्रशासनाने राज्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत अत्यल्प भाव जाहिर केल्याचा निषेध व्यक्त केला. उसाला २१०० नव्हे तर २७०० रूपये भाव जाहिर करण्यात यावा, अशी मागणी केली. देव्हाडा येथील कारखाना शेतकऱ्यावर का अन्याय करीत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला.
कमी भावामुळे उत्पादन खर्च निघणार नाही, यामुळे कुटुंबाचे भरणपोषण व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भुमिका घेत शेतकऱ्यांनी मागण्यांसंबंधीचे निवेदन १४ ऑगस्ट २०२३ रोजी शेतकऱ्यांनी दिले होते. पण, यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत मोर्चा काढला, आपली मागणी रेटून धरली. परंतु, तोडगा न निघाल्याने आंदोलन फसल्याची चर्चा परिसरात व्यक्त होत आहे.
आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी यादोराव मूंगमोडे जांभोरा, मनीष परसूरामकर खोड शिवनी, मुकेश गहाणे हेट्टी, योगराज पारधी मलुटोला, हेमराज हातझाडे सोमलपुर, अनिल लंजे बोलादा, अशोक बोरकर पाथरी, देवेश कशिवार मुरपार, यशवंत कापगते उमझरी यांनी केले.
तोडगा न काढता पळाले उपाध्यक्ष
आंदोलनादरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. वारंवार टोलवटोलवी करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता त्यांनी पळ काढल्याचे आंदोलक शेतकरी यादोराव मुंगमोडे यांनी कळविले.
तर...बॉयलर प्रज्वलनावेळी आंदोलन करू
कारखाना प्रशासन दरवाढी बाबतील मायेची फुंकर घालून दरवाढीसंबंधात योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आंदोलक शेतकऱ्यांत होती. परंतु, कोणताही निर्णय न घेता उपाध्यक्षांनी काढता पाय घेतल्याने आंदोलक चांगलेच भडकले आहेत. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बॉयलर प्रज्वलन वेळी आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.