तलाव रपट्याच्या बांधकामासाठी ३२ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:59 PM2018-04-27T22:59:12+5:302018-04-27T22:59:42+5:30
१९९२ पासून रखडलेल्या जांभळापाणी तलावाच्या रपट्याचे काम अखेर मंजूर झाले. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाच्या साठवण क्षेत्रात वाढ होण्यासाठी आवश्यक रपट्याच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचे माध्यमातून ३२ लाखांचा निधी प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : १९९२ पासून रखडलेल्या जांभळापाणी तलावाच्या रपट्याचे काम अखेर मंजूर झाले. जलयुक्त शिवार योजनेतून तलावाच्या साठवण क्षेत्रात वाढ होण्यासाठी आवश्यक रपट्याच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग भंडारा यांचे माध्यमातून ३२ लाखांचा निधी प्राप्त झाला. यामुळे तलावाच्या सिंचन क्षमतेत वाढ होवून १८७ एकर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. सदर कामाचे भूमीपूजन जिल्हा परिषद सदस्य निलीमा इलमे यांचे हस्ते झाले.
जांभळापाणी तलावाच्या तुटलेल्या रपट्याच्या बांधकामाची सन १९९२ पासून मागणी होती. परंतू शासन स्तरावरुन निधी मिळत नसल्यामुळे सिंचन क्षमता व साठवण क्षमता बाधीत झाली होती. उन्हाळयाच्या सुरुवातीलाच तलावात पाण्याचा ठणठणाट राहतो. शेती, जनावरांना पिण्याचे पाणी व वापराच्या पाण्यासाठी तलावाकाठच्या जांभळापाणी वासियांनी नेहमी भटकण्याची वेळ येते. तलावाच्या रपट्याच्या बांधकामासाठी तसेच कालवा व गेटच्या दुरुस्तीसाठी यापुर्वी ६२ लाखांचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला होता. परंतू शासनाने प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता दाखवीत निधी दिला नाही.
त्यामुळे बांधकाम रखडलेले होते. जिल्हा परिषद सदस्या निलिमा इलमे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेशी सतत पाठपुरावा केल्यामुळे दोन वर्षानंतर रपट्याच्या कामासाठी ३२ लाखांचा निधी जलयुक्त शिवार योजनेतून देण्यात आला. यामुळे जांभळापाणी या कोरड्या पडलेल्या तलावाची खरीपातील लाभ क्षमता ५० हेक्टरवरुन ७५ आर होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.
भूमीपूजन कार्यक्रमाला जि.प. सदस्या निलिमा इलमे, सरपंच संतोष शेंडे, उपसरपंच कैलाश कंगाले, सदस्य दुर्गाबाई बांडेबूचे, संगिता बुरडे, सपना बुरडे, निलकंठ बांडेबूचे, तुकाराम ढबाले, कविता बांडेबूचे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निशिकांत इलमे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता महेश सेलोकर, कंत्राटदार मोटघरे तुमसर, मनिष लांजेवार, ग्रामसेवक अशोक बागडे, माजी उपसरपंच अशोक शेंडे आदी उपस्थित होते.
तलाव उथळ, कालवे व गेट नादुरुस्त
मोहाडी तालुक्यातील जांभळापाणी तलावात मोठया प्रमाणात गाळ साचलेला असून उथळ झालेला आहे. त्यामुळे तलावात पाण्याची पूर्ण क्षमतेने साठवणूक करता येत नाही. तलावाची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तलावाचे खालीकरण व गाळाचा उपसा होणे गरजेचे आहे. खरिपातील सिंचनासाठी, पाण्याची निकासी होण्यासाठी असलेले एकमेव कालवा व गेट तुटलेली आहे. वर्षभर पाणी 'लिकेज' होत असतो. तलाव व कालवा देखरेखीअभावी ठिकठिकाणी नादुरुस्त आहे. गळतीमुळे उन्हाळयापूर्वीच तलावात पाण्याचा ठणठणाट राहतो. तलावाच्या गेटची दुरुस्ती, कालव्याचे नुतनीकरण व खोलीकरण होण्याची आवश्यकता आहे.
जांभळापाणी तलाव २० हेक्टर क्षेत्रात विस्तारीत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून तलावाच्या रेंगाळलेल्या रपट्याचे काम आता पूर्ण होणार असल्याने शेतीच्या लाभ क्षेत्रात वाढ होणार आहे. परंतु सिंचन क्षमता १०० टक्के होण्यासाठी खोलीकरण, एकमेव गेट व कालव्याचे नुतनीकरण व दुरुस्त्या होणे गरजेचे आहे.
-संतोष शेंडे, सरपंच, गटग्रामपंचायत मोहगाव/ जांभळापाणी.
मागील चार वर्षांपासून सतत करडी परिसरात दुष्काळ होत आहे. जलयुक्त शिवार योजनेतून जांभळापाणी तलावाच्या रपट्याच्या बांधकामामुळे पाण्याच्या साठवणूकीत वाढ होण्यास मदत होईल. परंतु तलावाचा फायदा होण्यासाठी खोलीकरणासोबत नहरांचे खोलीकरण व दुरुस्ती तसेच गेट व कालव्यांच्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
- नीलिमा इलमे, जि.प. सदस्या, करडी.