गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ३७३४.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:19 PM2023-07-18T12:19:25+5:302023-07-18T12:21:17+5:30
पुढचे तीन दिवस पुन्हा पावसाचे
पवनी (भंडारा) : गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्पातील पाणी पातळी वाढलेली आहे. पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.
गोसी खुर्द प्रकल्पाची सद्यस्थितीत पाणी पातळी २४२ .९८० मीटर आहे. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात केला जात आहे. प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मागील तीन दिवसांत दोन वेळा गेट उघडण्यात आले आहेत.
पुजारीटोलाचे ४, तर धापेवाडाचे २३ गेट सुरु
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार, पुजारीटोला धरणाचे ४ गेट सुरु करण्यात आले आहेत. बावनथडीचे अद्याप एकही गेट उघडण्याची वेळ आलेली नाही. धापेवाडा बॅरेजचे २३ गेट उघडण्यात आले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदी-नाल्याच्या काठावरील गावांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.
कारधाची पातळी इशारापेक्षा कमी
- कारधा पुलावरील पाण्याची पातळी सोमवारी रात्री ८- वाजता नोंद घेतल्यानुसार, २४३.१६ मीटर नोंदविली गेली. धोक्याच्या इशाऱ्यापेक्षा ही पातळी कमी असल्याने सध्यातरी कसलाही इशारा नाही.
- हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील १९ ते २१ जुलै हे तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे. एक-दोन ठिकाणी विजांसह तीव्र पाऊस होण्याची शक्यता असून मंगळवारी ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला आहे.