सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले

By युवराज गोमास | Published: July 20, 2024 03:34 PM2024-07-20T15:34:57+5:302024-07-20T15:36:04+5:30

निवासी परिसरासह व्यावसायिक प्रतिष्ठानांत पाणी : रस्त्यांवरील वाहतूक प्रभावीत

33 gates of Gose dam and 5 gates of Dhapewada were opened | सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले

33 gates of Gose dam and 5 gates of Dhapewada were opened

युवराज गोमासे

भंडारा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील खोलगट भागात अनेक तास पाणी पाणी साचून राहील्याने हाहाकार उडाला. वाहतूक प्रभावीत झाली. घरादारात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. व्यापारी प्रतिष्ठानांतील तळभागात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. अतिवृष्टीमुळे गोसे खुर्द धरणाचे ३० गेट अर्धा मिटरने तर ३ गेट एक मिटरने उघडण्यात आली असून ३९८७.७५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडाची ५ गेट ०.७५ मिटरने उघडण्यात आली असून ३६३.१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.भंडारा शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. दुपारी १२.३० पर्यंत ९५.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४० मंडळापैकी २३ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. सर्वाधिक ३४१.५ मिमी पाऊस लाखांदूर तालुक्यातील बारव्हा मंडळात नोंदविण्यात आला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक मार्ग अवरूद्ध झाले. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील नाली, गटारे ओसंडून वाहीले. नाली व गटारातून पाणी परिसरात पसरल्याने सगळीकडे प्लास्टीक व कचऱ्यांचा खच पहावयास मिळाला. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुट पाणी शिरल्याचे चित्र पहावयास मिळाले. प्रशासनाच्यावतीने नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. सायंकाळपर्यंत नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

 

या भागात शिरले पावसाचे पाणी

शहरातील ग्रामसेवक कॉलोनी परिसर, भोजापूर व शिक्षक कॉलोनी महामार्ग परिसर, शिवाजी नगर नागपूर नाका भाग, भंडारा-वरठी महामार्गावरील डीमार्ट परिसरातील खोलगट भाग, आयटीआय परिसर, खात रोड आनंद मंगल कार्यालय परिसर, जुना साई मंदिर कारधा रोड परिसर, मेंढा परिसरातील सखल भाग पावसामुळे प्रभावीत झाले. खाेलगट भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा सामान्य रूग्णालयातील खोलगट भागातही अर्धा फुटापर्यंत पाणी साचून होते. नागरिकांनी पाण्यातून मार्गक्रमण केले. शहराचा बाहेरील भाग अतिवृष्टीने सर्वाधिक प्रभावीत झाला.


नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन मदतीला

शहरात अतिवृष्टीमुळे नाली व गटारे अवरूद्ध झाली. परिस्थिती सामान्य करण्यासाठी सकाळपासून नगरपालिका कर्मचारी हाती टिकास, फावडे व अन्य साहित्यांसह गटारांची स्वच्छता करताना दिसून आले. नाल्यांतील केरकचरा बाजूला सारून पाणी वाहते करण्याची कामेे प्राधान्याने करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

 

राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

शहरातून जाणाऱ्या भंडारा-साकोली महामार्गावरील जूना कारधा टोल नाका शेजारील डोंगराची दरड कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक प्रभावीत झाली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत वाहतूकीचा मार्ग प्रशस्त केला.


जिल्हाधिकाऱ्यांची केली सुट्टी जाहीर

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. सकाळच्या सुमारास भर पावसात पोहचलेल्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना आल्यापावली परतावे लागले.

Web Title: 33 gates of Gose dam and 5 gates of Dhapewada were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.