लाखांदूर तालुक्यातील 33 गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 05:00 AM2022-06-22T05:00:00+5:302022-06-22T05:00:06+5:30
स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दयाल भोवते
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : नियमित वीजबिलासह मागील काही महिन्यांपासून थकीत वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत लाखांदूर तालुक्यातील ३३ गावांतील पथदिव्यांची व २ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३३ गावात अंधार पसरला असून दोन गावांत पिण्याच्या पाण्याचे जलसंकट निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत एकूण ६२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज कंपनीअंतर्गत एकूण १०३ पथदिव्यांचे कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील १०३ पथदिव्यांच्या कनेक्शनअंतर्गत एप्रिल २०२१ पासून ते एप्रिल २०२२ पर्यंत एकूण ९ लाख ८६ हजार रुपयाचा वीजबिल नियमित वीजबिलाअंतर्गत थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तथापि, ग्रामपंचायतअंतर्गत सदर वीजबिलाचा भरणा न केल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत तब्बल ३३ ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
या संख्येत येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण १०३ पथदिव्यांची कनेक्शनअंतर्गत थकीतदार ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांश वीजपुरवठा खंडित केले जाण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील ३३ गावांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने जमिनीतून विषारी जीवजंतू जमिनीबाहेर निघण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे. या स्थितीत रात्रीच्या सुमारास पथदिव्यांच्या अभावात रस्त्यावर अनेक जीवजंतू निघण्याची संभाव्यता घेऊन नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
पाण्याची समस्या कायम
- लाखांदूर तालुक्यातील पाउळदवणा व मडेघाट ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदरचा वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या स्थितीत स्थानिक नागरिकांना बोरवेल, खासगी तथा सार्वजनिक विहिरीतून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेत वीज कंपनीअंतर्गत थकीत वीजबिलाचा भरणा घेऊन केल्या जात असलेल्या कारवाईला थांबविण्याहेतू आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.