जिल्ह्यात ३४ टक्के पेयजलस्रोत दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:39 PM2018-10-02T21:39:12+5:302018-10-02T21:40:08+5:30

आजाराचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी होय. दूषित पाणी प्राशनाने विविध आजार होतात. यातून नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील ३४ टक्के पेयजलाचे नमूने तपासणीनंतर दूषित असल्याचे आढळून आले. त्यात लाखनी, तुमसर, भंडारा, साकोली आणि पवनी तालुक्यातील सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे पुढे आले आहे.

34 percent of the drinking water source is polluted in the district | जिल्ह्यात ३४ टक्के पेयजलस्रोत दूषित

जिल्ह्यात ३४ टक्के पेयजलस्रोत दूषित

Next
ठळक मुद्देसर्वेक्षणातील वास्तव : पाच तालुक्यात सर्वाधिक दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आजाराचे मूळ कारण म्हणजे दूषित पाणी होय. दूषित पाणी प्राशनाने विविध आजार होतात. यातून नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील ३४ टक्के पेयजलाचे नमूने तपासणीनंतर दूषित असल्याचे आढळून आले. त्यात लाखनी, तुमसर, भंडारा, साकोली आणि पवनी तालुक्यातील सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे पुढे आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी आणि स्वच्छता मिशनच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सात तहसीलमधील पिण्याच्या पाण्याचे नमूने गत जुलै ते डिसेंबर या महिन्यात तपासण्यात आले. जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतमधील ६ हजार ३९४ पेयजलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात १ हजार ९०७ नमुने दूषित आढळून आले. त्याची टक्केवारी ३४.९५ आहे. पेयजलाचे नमुने दूषित आल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने तेच पाणी प्यावे लागत आहे. यातून जलजन्य आजारासह विविध आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यातील ६ हजार ३९४ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात वेगवेगळ्या प्रमाणात दूषित पाणी आढळून आले. भंडारा तालुक्यात एकुण पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत ८९३ असून त्यापैकी ८५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४४७ म्हणजे ४१.०५ टक्के नमुने दूषित आढळले. साकोली तालुक्यातील १२३८ नमुन्यांपैकी ४४२ म्हणजे ३४.०५ टक्के, लाखनी ४०० पैकी ३६१ म्हणजे ७५.२५ टक्के, तुमसर १०३१ पैकी ४३५ म्हणजे ४४.५७, मोहाडी तालुक्यातील ८०० पैकी १५३ म्हणजे १९.१८ टक्के, लाखांदूर तालुक्यातील ५४१ पैकी ४३ म्हणजे ७.९५ टक्के आणि पवनी तालुक्यातील ७७६ पैकी १९७ म्हणजे २५.३८ टक्के जलस्त्रोत दूषित आढळून आले. दूषित आढळलेल्या जलस्त्रोताबाबत जिल्हा परिषदेने दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज असते. परंतु अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
ग्रामपंचायतीने जागरुक असणे गरजेचे
अशुद्ध पाण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतींनीच जागरुक असणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण आरोग्य आणि पाणी पुरवठा समितीवर शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी असते. पाणी दूषित आढळल्यावर त्याचे शुद्धीकरण करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी सभा घेणे गरजेचे आहे. कमीत कमी तीन महिन्यात एकदा सभा होणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागात या संदर्भातील सभा होत नसल्याने ही समस्या कायम आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे पाणी गुणवत्ता तज्ज्ञ प्रशांत मडामे यांनी सांगितले.
भंडारा शहरातही दूषित पाणी
भंडारा शहराला वैनगंगा नदीच्या पाण्याचा पुरवठा होते. सध्या वैनगंगा नदीच्या पाण्यात नागपूर येथून वाहणाऱ्या नाग नदीचे दूषित पाणी सोडले जात आहे. यामुळे पाण्याचा रंग बदलल्याचे भंडारा शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत दिसून येते. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला सूचना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातही पुरेसे पाणी शुद्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्राशन करावे लागते. यातून भंडारा शहरातही जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे.
वर्षातून दोनदा पाणी तपासणी
जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्ह्यात वर्षभरातून दोनदा पाण्याची तपासणी केली जाते. पावसाळा आणि उन्हाळ्याच्या काळात ही तपासणी होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पाण्याचे नमुने गोळा केले जातात. ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यावरून आलेल्या अहवालानुसार कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु भंडारा जिल्ह्यात दूषित पाण्याच्या संदर्भात पाहिजे तशी काळजी घेतली जात नाही. प्रशासन ग्रामपंचायतींना वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायती पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीसाठी शुद्ध पेयजलाच्या विविध योजना असताना त्याचा फायदाही घेतला जात नाही.

Web Title: 34 percent of the drinking water source is polluted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.