३५०० जि.प. शिक्षक घेणार ‘सामूहिक रजा’
By admin | Published: October 2, 2016 12:35 AM2016-10-02T00:35:50+5:302016-10-02T00:35:50+5:30
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करून, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त विविध भौतिक सुविधांची संपन्नता शाळेत आणण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे....
शिक्षक कृती समितीचा निर्णय : जिल्हा परिषद प्रशासनाची उडाली तारांबळ
भंडारा : शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करून, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त विविध भौतिक सुविधांची संपन्नता शाळेत आणण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. असे असतानाही जि.प. शिक्षण विभाग व प्रशासनाने शिक्षकांची थट्टा चालविली आहे. त्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने त्यांच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ३,५०० शिक्षकांनी गुरुवारला सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असल्याने त्यांनी आता सावरासारव सुरु केली आहे.
शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध संघटना एकत्र आल्या आहेत. या कृती समितीने त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी अनेकदा जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन दिले. अनेकदा चर्चा झाल्यात. मात्र या विविध संघटनांना केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. मात्र मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप आता शिक्षकांनी केला आहे.
शिक्षक कृती समितीमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचा समावेश आहे.
या कृती समितीत जिल्हा परिषद प्रशासनाला २९ आॅगस्ट व २६ सप्टेंबरला निवेदन देऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची विनवणी केली. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ३ हजार प्राथमिक शिक्षक व ५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे असे ३५०० शिक्षक सामूहिक रजा घेत आहेत. यानंतर जिल्हा परिषद समोर हे शिक्षक एकत्र येऊन एक दिवसाचा महाधरणे आंदोलन करणार आहेत.
या सामूहिक रजा धरणे आंदोलनाचे नेतृत्व मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, किशोर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, सुधीर वाघमारे, गोपाल तुरकर, संदीप वहिले, विकास गायधने, केशव बुरडे, राजन सव्वालाखे, जयंत उपाध्ये, शाम ठवरे, रमेश काटेखाये, दिलीप बावनकर, शंकर नखाते, हिरालाल शहारे, ज्ञानचंद जांभुळकर, बलवंत भाकरे, श्रीधर काकीरवार, सुधाकर ब्राम्हणकर, जी.एस. भोयर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, प्रमोद घमे, मुकुंद ठवकर, संजीव बावनकर, महेश गावंडे, प्रभू तिघरे, रविंद्र उगलमुगले, व्ही. टी. बंसोड, पुरूषोत्तम झोडे, दिलीप गभणे आदी करणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
अशा आहेत शिक्षकांच्या समस्या
अनेक पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ नाही, शिक्षक सेवेत कायम करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत, शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला देण्यात यावे, २३ सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेली मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा रद्द केली त्याचे स्पष्टीकरण देण्यात यावे, महिनाभरापासून मुख्य कार्यपालन अधिकारी यांना चर्चा करण्यासंदर्भात वेळ मागितल्यानंतरही कृती समितीला त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. यासोबतच शालेय पोषण आहाराचे थकीत मानधन व गणवेश व उपस्थिती भत्याचा प्रश्न अधांतरी असल्याने त्यावर तोडगा काढणे यासह अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
जि.प. प्रशासनाची सावरासारव
शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला ६ आॅक्टोबरला सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्षित करणाऱ्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तारांबळ उडेल या भावनेने आज घाईगडबडीने शिक्षकांच्या सर्व समस्या निकाली काढल्या व वेतन १ तारखेलाच होणार असल्याचे पत्र प्रसिद्धीसाठी दिले आहे. यातील अनेक समस्या अद्यापही अधांतरी असल्याने व शिक्षक संघटनाला चर्चेसाठी वेळ न देणाऱ्या प्रशासनाच्या या पत्राची आता शिक्षकांकडून खिल्ली उडविल्या जात आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचा हास्यास्पद प्रकार
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व अन्य शिक्षक संघटना मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाची लढा देत आहे. मात्र शिक्षकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शिक्षणाधिकारी (प्राथ.) स्वर्णलता घोडेस्वार यांनी ३० सप्टेंबरला एक हास्यास्पद पत्र संबंधित सर्व संघटनांना दिले आहे. यात त्यांनी शिक्षक संघटनेला शासनाने नोंदणीकृत केले आहे किंवा कसे, शासनाने नोंदणीकृत केले असल्यास त्याचे नोंदणीची प्रत/ आदेशाची प्रत कार्यालयात त्वरीत सादर करावे. असे आदेश बजावल्याने हा आदेश आता शिक्षकांमध्ये हास्यास्पद ठरला आहे.