३६ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:05+5:302021-04-21T04:35:05+5:30
भंडारा : खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा गुंता अद्यापही कायम आहे. ३७ लाख ५१ हजार क्विंटल धानाची खरेदी ...
भंडारा : खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा गुंता अद्यापही कायम आहे. ३७ लाख ५१ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ १ लाख २५ हजार क्विंटल धानाचीच भरडाई झाली. अद्यापही ३६ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. यातील अर्धाअधिक धान उघड्यावर असून, मिलिंगला आता सुरुवात केली तरी भरडाईला तीन महिने लागतील. यामुळे आगामी उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न गंभीर होणार आहे.
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र धान खरेदीचा दरवर्षी हंगामात प्रश्न निर्माण होतो. गूदामांचा अभाव हे त्यातील प्रमुख कारण होय. यावर्षी खरीप हंगामात पणन महासंघाने ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. खरेदी केलेला धान गोदामात ठेवला जातो. तेथून तो भरडाईसाठी पाठविला जातो. मात्र यावर्षी भरडाईच्या दरावरून मिलर्स आणि शासन यांच्यात गुंता निर्माण झाला. मध्यंतरी हा गुंता सोडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तांदळाच्या उताऱ्यावरून गुंता वाढला. त्यामुळे मिलर्सनी भरडाईसाठी धानच उचलला नाही. तब्बल ३६ लाख क्विंटल धान अद्यापही भरडाईच्या प्रतीक्षेत आहेत.
भंडारा जिल्ह्यात २०३ मिलर्स असून, त्यापैकी १५० मिलर्सना धान भरडाईसाठी डीओ देण्यात आले. मात्र त्यांनी धानाची अद्यापही उचल केली नाही. जिल्ह्यातील २५० गुदामे धानाने भरली असून अर्धेअधिक धान उघड्यावर आहे. या धानाची कधी भरडाई होणार, हा प्रश्न आहे. अवकाळी पावसाचे कायम सावट असून उघड्यावरील धान खराब होण्याची भीती आहे. सध्या हा धान ताडपत्रीने झाकला असला तरी पावसामुळे तो खराब होण्याची भीती आहे.
बाॅक्स
उन्हाळी धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर
जिल्ह्यातील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाने गुदामे फुल्ल झाली आहेत. अर्धाअधिक धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत महिनाभरात उन्हाळी धान विक्रीसाठी येणार आहे. या धानाची खरेदी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आता या ३६ लाख क्विंटल धानाच्या भरडाईला सुरुवात केली तरी सुमारे तीन महिने लागू शकतात. त्यामुळे उन्हाळी हंगामातील धानाची खरेदी होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाॅक्स
१७० कोटी रुपयांचे पेमेंट थकीत
भंडारा जिल्ह्यात ३७ लाख ५१ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी पणनने केली आहे. आधारभूत किमतीप्रमाणे या धानाची किंमत ७०० कोटी ७४ लाख १० हजार ३५५ रुपये आहे. आतापर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांना ५२९ कोटी ९३ लाख ८४ हजार १३२ रुपयांचे चुकारे देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही १७० कोटी ८० लाख २६ हजार २२२ रुपयांचे चुकारे थकीत आहेत. या शेतकऱ्यांना चुकारे कधी मिळणार हे मात्र कुणीच सांगायला तयार नाही.