पवनी येथे ३६ तर एका बालिकेवर भंडाऱ्यात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:35+5:302021-03-18T04:35:35+5:30
पवनी : पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्या तब्बल ७८ रुग्णांपैकी सध्या पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ जणांवर उपचार सुरू असून, ...
पवनी : पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्या तब्बल ७८ रुग्णांपैकी सध्या पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ जणांवर उपचार सुरू असून, एका सहा वर्षीय बालिकेला अधिक उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर भेंडाळा येथेही आरोग्य विभागाचे शिबिर सुरू आहे. दरम्यान गावातील पाण्याचे, पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तूर्तास याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही.
तालुक्यातील भेंडाळा येथे रविवारी पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ७८ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. तर ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११) या बालिकेचा विषबाधेने मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने गावात शिबिर सुरू करून उपचार सुरू केले. त्यापैकी ३९ जणांना पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान दोन रुग्णांना सुटी देण्यात आली असून, सेजल विलास वैद्य (६) या बालिकेला उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. भेंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या शिबिरात मळमळ आणि उलटीची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेने महसूल, आरोग्य आणि पोलीस यंत्रणा भेंडाळा गावात दाखल झाली. गावातील सर्वांची तपासणी करण्यात आली. तूर्तास सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक रियाज फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन घटनाक्रम समजून घेतला.
बालिकेच्या अन्ननलिकेतील द्रवाचे नमुने फाॅरेन्सिक लॅबकडे
पाणीपुरीतुन विषबाधा झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या ज्ञानेश्वरी सतीबावणे या बालिकेचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. मात्र तिच्या रक्ताचे आणि अन्ननलिकेतील द्रवाचे नमुने फाॅरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. आरोग्य व पोलीस विभाग प्रयोगशाळेकडून प्राप्त होणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. त्यानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.