केंद्र सरकारच्या निधीअभावी ३६४ घरकुल अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:03+5:302021-09-14T04:42:03+5:30
तुमसर नगर परिषद येथे २०१७ -१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६४ घरकुलांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार ...
तुमसर नगर परिषद येथे २०१७ -१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३६४ घरकुलांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने ३६४ कोटी रुपयांचे अनुदान दिले. परिणामी, लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाला सुरुवातही केली. मात्र, तीन वर्षे लोटूनही केंद्र सरकारकडून आतापर्यंत त्या घरकुलासाठी एक दमडीही दिली गेली नाही. मात्र भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नगर पंचायतींना केंद्र सरकारचा निधी मिळाला असताना केवळ लाभार्थ्यांची दिशाभूल करून लाभार्थ्यांना उलटसुलट उत्तरे नगर परिषदेकडून देत सुटले आहेत. केंद्रात व नगर परिषदेमध्ये एकहाती सत्ता असताना निधी मिळण्यास विलंब होण्यामागे केवळ नगर परिषदेत हलगर्जीपणा आहे. वास्तविकता अजूनपर्यंत घरकुलाचे मॅपिंग व आदी दस्तऐवज नगर परिषदेने म्हाडाला जमा केले नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून घरकुल लाभार्थी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहे. त्यावर कोरोनात लाभार्थी रोजगाराला मुकल्याने राहायला घर नाही आणि खायायला अन्न नाही, अशी विदारक परिस्थिती आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले असून १० दिवसांत घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस उग्र आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, सुनील थोटे, पमा ठाकूर, नगरसेवक सलाम तुरक, प्रदीप भरणेकर, जाकीर तुरक, तिलक गजभिये, रामकृष्ण उकरे, जयश्री गभने, स्वेता कहालकर, गोवर्धन किरपाने, आयुष बारई, संकेत गजभिये, मयूर मेश्राम, करण जुवार, बंटी भुरे, यासीन छवारे, आरती चकोले, नंदा डोरले, सुनीता तिवारी, अतुल सार्वे, श्रुती कावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.