नवोदय विद्यालयाला दिले ४० बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:16 PM2018-11-12T22:16:55+5:302018-11-12T22:17:17+5:30
सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे. हा निधी बँक आॅफ इंडियाच्या ग्रामीण प्रसार अंतर्गत देण्यात आला आहे. यात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका बजावल्याने दिवाळीपूर्वी बेड विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत.
भंडारा येथील नवोदय विद्यालयाला स्वत:ची अद्यापही इमारत नाही. काही महिन्यापूर्वी भंडारा येथून या विद्यालयाला मोहाडी येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या इमारतीत हलविण्यात आले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु सुसज्ज अशी निवास व्यवस्था नव्हती. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. त्यातूनच येथे बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यावरून बँक आॅफ इंडिया ग्रामीण प्रसार निधी अंतर्गत ४० बेडसाठी २ लाख ८३ हजार रुपये मंजूर झाले. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या पुढाकाराने ८० विद्यार्थ्यांच्या बेडची व्यवस्था करण्यात आली. यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा केली.
विशेष म्हणजे आतापर्यंत प्रसार निधी अंतर्गत सर्व खर्च विभागीय स्तरावरूनच होत होता. मात्र पहिल्यांदाच एका चांगल्या उपक्रमासाठी हा निधी जिल्हास्तरावर देण्यात आला. यासाठी बँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक चंद्रशेखर निंबुळकर, विभागीय व्यवस्थापक विलास पराते यांची भूमिका महत्वाची राहिली. दिवाळीपूर्वी हे बेड विद्यार्थ्यांच्या सेवेत रूजू झाले आहेत.
निंबुळकर नवोदयचे माजी विद्यार्थी
बँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक चंद्रशेखर निंबुळकर हे नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालयातूनच झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. या आस्थेतूनच त्यांनी हा निधी बेड खरेदीसाठी दिला.