४० गावांचे शेतीरस्ते पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:49 PM2018-10-12T22:49:53+5:302018-10-12T22:50:59+5:30
गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही.
पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावांचा पुनर्वसनांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित क्षमतेपर्यंत वाढविण्याची सुचना आहे. परंतु यावर्षी प्रकल्प प्रशासनाने २४३.५०० मीटर जलसाठा केला आहे. आणखीनही जलसाठ्यात वाढ करण्याचा विचार प्रकल्प प्रशासनाचा आहे. या वाढत्या जलसाठ्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ४० गावातील शेत रस्ते गोसीप्रकल्पाच्या पाण्यात बुडाले आहे. गत महिनाभरापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अनेकदा कंबरभर पाण्यातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. विशेष म्हणजे अंशत: बाधीत ३२ गावांचे पुनर्वसन होण्यापुर्वीच जलपातळी वाढविली आहे. यामुळे या गावातही पाणी शिरण्याची भीती आहे. तसेच अनेक गावातही पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाच्या अधिकाºयांना वारंवार सुचना दिली. प्रशासन म्हणते धोका होणार नाही परंतु पाणी पातळी वाढवितच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.
या आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
आदी पुनर्वसन मगच धरण या धोरणाची अंमलबजावणी करावी, प्रकल्पबाधीत कुटुंबातील तरूणाला नोकरी किंवा एकमुस्त २५ लाख रूपये द्यावे, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, आंभोरा देवस्थान ते बोरगाव मंजुर पूल तात्काळ बांधावा आणि शेतीचे आर्थिक मोबदले द्यावे, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.
गावकऱ्यांना १५ किमीचा फेरा
सालेबर्डी, खैशी, कवडशी या गावातील नागरिकांना शहापूर मार्गे बाहेर जाण्यासाठी सध्या १५ किमीचा फेरा मारावा लागत आहे. कवडसी नालापुलावर चार ते पाच फुट पाणी असल्याने हा प्रमुख रस्ता बंद पडला आहे. यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांना तर पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे खैरी गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी येणाऱ्या मजुरांना फेरा मारून यावे लागत असल्याने ते दुप्पट मजुरी मागत असल्याचे अनेकांनी सांगितले.
नागपूर येथे प्रहारच्या नेतृत्वात आंदोलन
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या १८ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाही तर १९ आॅक्टोबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले यांनी दिली.