पालिका हद्दीत ४१६ बालके कुपोषित
By Admin | Published: July 1, 2017 12:20 AM2017-07-01T00:20:49+5:302017-07-01T00:20:49+5:30
बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
वर्षभरातील आकडेवारी : १५ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी लक्षावधींचा खर्च करण्यात आला असला तरी एक वर्षभरात कुपोषणामुळे १५ बालकांचा मृत्यू झाला आहे. भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालीका हद्दीतील ही आकडेवारी आहे.
जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर या तीन्ही नगरपालिका क्षेत्रात शंभरपेक्षा जास्त आंगणवाड्या आहेत. मागील वर्षभरात बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालयांतर्गत भंडारा व पवनी येथे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती ० ते ६ वयोगटातील जवळपास ८ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ४१६ बालके कुपोषीत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी १५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जून २०१६ ते मे २०१७ या कालावधीत भंडारा, पवनी आणि तुमसर या नागरी क्षेत्रांतर्गत ० ते ६ वयोगटातील ८ हजार २६७ बालकांपैकी ३९३ बालके मध्यम तिव्र स्वरुपात कुपोषीत असल्याचे तर २३ बालके अति कुपोषित श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ६ हजार ६४२ साधारण कुपोषण श्रेणीत असल्याचे दिसून आले.
विभागानुसार घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीत ० ते १ या वयोगटातील १५ बालके कुपोषणामुळे दगावली आहे.
सर्वेक्षणात ० ते ६ महिने वयोगटातील ७४३ बालके, सहा महिने ते एक वर्ष वयोगटातील ८६५, एक वर्ष ते ३ वर्ष वयोगटातील २ हजार ९३८ तर तीन वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील २ हजार ७३१ बालके कुपोषीत असल्याचे घोषीत करण्यात आले.
राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर प्रभावी कार्य सुरु आहे. बालकांचा कुपोषणावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.
- सुरेश ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भंडारा.