४.२० कोटींचे चुकारे अडले
By admin | Published: March 5, 2017 12:22 AM2017-03-05T00:22:49+5:302017-03-05T00:22:49+5:30
जिल्हा मार्केटिंग कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यताील ६१ आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून ९ लाख ५६ हजार २३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली.
९.५६ लाख क्विंटल धान खरेदी : १२८.६३ कोटींचे चुकारे मिळाले
भंडारा : जिल्हा मार्केटिंग कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यताील ६१ आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून ९ लाख ५६ हजार २३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या धानाचे सुमारे ४ कोटी २० लाख २३,७०८ रूपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अडलेले आहेत.
राज्य सरकारने धानाला २०० रूपये प्रति क्विंटल बोनस देण्याची घोषणा केली होती. बहुतांश शेतकरी बाजार समितीत धान विकण्याला प्राधान्य दिले असले तरी काही शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये धान नेण्यासाठी वाहतुकीची साधने नसल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. यावर्षी असमाधानकारक पाऊस असला तरी पीक मात्र समाधानकारक झाले.
आतापर्यंत जिल्ह्यात ९ लाख ५६ हजार २३८ क्विंटल धान खरेदी झाली. नियमानुसार आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना चुकारे देणे गरजेचे आहे. परंतु सरकारने अद्याप अनेक शेतकऱ्यांना चुकारे दिलेले नाही. विशेष म्हणजे सरकारने यावर्षी पहिल्यांदा आॅनलाईन धान खरेदी केली. (जिल्हा प्रतिनिधी)
३१ मार्चनंतर धान खरेदी बंद
आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान्याची विक्री केल्यानंतर २४ तासाच्या आत पैसे जमा होणे गरजेचे आहे. परंतु या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी वेळेत खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. खरीप हंगामातील धान खरेदी अंतिम टप्प्यात असून ३१ मार्चनंतर ही धान खरेदी बंद करण्यात येणार आहे. आतापर्यंत खरेदी केलेल्या धान्यापैकी १२८ कोटी ६३ लाख ३७,९७७ रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात आॅनलाईन जमा झालेले आहे. आणखी ४ कोटी २० लाख २३,७०८ रूपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे अडलेले आहेत. काही शेतकऱ्यांना तर महिना लोटूनही पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेआहे.
शेतकऱ्यांची पायपीट
धान्य विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैशासाठी पायपीट करावी लागत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील धान्याची आॅक्टोबरपासून खरेदी करण्यात आली. सरकारने २०१६-१७ या हंगामात ‘अ’ ग्रेडच्या धानाला १,५१० रूपये तर ‘ब’ ग्रेडच्या धानाला १,४६० रूपये क्विंटल दराने धान खरेदी केली.