शेतकऱ्यांसाठी ४३ कोटी मंजूर
By admin | Published: February 1, 2017 12:22 AM2017-02-01T00:22:48+5:302017-02-01T00:22:48+5:30
मुख्यमंत्री विशेष निधीअंतर्गत भंडारा महावितरण मंडळास दोन टप्प्यात ४३ कोटींचा निधी मंजूर झाला.
महावितरणची आढावा बैठक : वीज पुरवठा, अटल सौर पंप योजनेचा समावेश
भंडारा : मुख्यमंत्री विशेष निधीअंतर्गत भंडारा महावितरण मंडळास दोन टप्प्यात ४३ कोटींचा निधी मंजूर झाला. या निधींतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा व अटल सौर पंप योजनेअंतर्गत सौर पंप देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुंबई येथील कार्यकारी संचालक (प्रकल्प) चंद्रशेखर येरमे हे सोमवारला भंडारा येथे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री विशेष निधीअंतर्गत मंजूर करावयाचा कृषी पंप मंजूरीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री विशेष निधीअंतर्गत भंडारा मंडळास ४३ कोटीचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा देण्याच्या प्रगतीचा व अटल सौर पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्याच्या योजनेचा आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत येरमे यांनी, पायाभूत आराखड्यांतर्गत कामे पुर्ण झालेल्या भंडारा, तुमसर, गोंदिया या तीन शहरातील वीज वितरण, वीज हानी व वसुलीबाबतचा आढावा घेतला.
या आराखड्यांतर्गत तीन शहरातील वीज वितरण जाळे मजबूत व कार्यक्षम करण्यासाठी, नविन वीज वाहिण्या उभारणे, नविन उपकेंद्राची निर्मिती व विद्यमान वीज वाहिण्यांवरील जुन्या झालेल्या तारांच्या बदलांसाठी कंपनीने ५० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. वरील सुधारणानंतर कंपनीच्या महसूलात वाढ झाल्याचे दिसून आले असून ग्राहकांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळण्यास मदत झाल्याची माहिती यावेळी दिली.
वीज जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्याचे प्रतिपादन बैठकीत अधिकाऱ्यांने दिले. सुरु करण्यात आलेली कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देश येरमे यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना दिले. सौरपंप लावलेल्या शेतास भेट देवून येरमे यांनी ग्राहकांचे मनोगत जाणून घेतले. त्यांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रास व वीज देयक भरणा केंद्रास भेट देवून कार्यप्रणाली जाणून घेतली व ग्राहकांच्या सुविधाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
कर्मचारी प्रशिक्षण केंद्राला या आढावा बैठकीनंतर भेट देण्यात आली. कामगारांना खेळीमेळीच्या वातावरणात तणावमुक्त प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले. कामगारांना अद्यायावत ज्ञान मिळावे म्हणून कंपनीबाहेरील तज्ज्ञ व जाणकारांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित करावे अशा सुचना यावेळी येरमे यांनी दिल्या. या बैठकीला गोंदियाचे परिमंडळाचे मुख्य अभियंता जे. एम. पारधी, पायाभुत आराखडा विभागाचे अधिक्षक अभियंता शंकर कांबळे, अधिक्षक अभियंता लिलाधर बोरीकर, भंडाराचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता भिमराव हिवरकर, साकोलीचे कार्यकारी अभियंता घाटोळे, देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता वाकोळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)