४४ पॉझिटिव्ह, जिल्हा हॉटस्पॉटच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:41+5:302021-02-27T04:47:41+5:30
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. दोन आकडी रुग्णसंख्या आढळत होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर तीन-चार ...
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. दोन आकडी रुग्णसंख्या आढळत होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तर तीन-चार रुग्णच आढळत होते. राज्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असताना भंडारा मात्र त्यापासून दूर होता. नागरिक यामुळे बिनधास्त होऊन कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपर्यंत २० च्या आत येणारा कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी तब्बल ४४ वर जाऊन पोहोचला. शुक्रवारी ९७० व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. तर भंडारा तालुक्यात १६, तुमसर १८, मोहाडी आणि पवनीत प्रत्येकी तीन तर लाखनी तालुक्यात चार रुग्ण आढळून आले आहेत. पवनी तालुक्यातील एका ७८ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा वाटेतच मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांची संख्या आता ३२८ वर जाऊन पोहोचली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र कोणत्याही नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. प्रशासनाच्या वतीने कागदी घोडे नाचवून कारवाई केल्याचा आव आणला जातो. परंतु त्याचा नागरिकांवर तसूभरही परिणाम होत नाही. भंडारा शहरातही प्रत्येक चौकात गर्दी दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर भंडाराही हॉटस्पॉट ठरवून लॉकडाऊनकडे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही.
बॉक्स
सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात
जिल्ह्यात शुक्रवारी २०५ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात १०१ रुग्ण आहेत. मोहाडी तालुक्यात १६, तुमसर ४९, पवनी सहा, लाखनी १९, साकोली १२ आणि लाखांदूर तालुक्यात दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा उद्रेक वाढत असून बाधित व्यक्तींनी सर्जिकल मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीयांनीही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.