तलावावर मासे पकडणे जीवावर बेतले; वाघाने जंगलात फरफटत नेऊन केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 10:58 AM2022-09-22T10:58:04+5:302022-09-22T11:00:39+5:30
भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध भागांतील जंगलात सीटी-१ या वाघाने धुमाकूळ घातला आहे.
लाखांदूर (भंडारा) : जंगला परिसरातील तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक गोंदिया जिल्ह्यातील असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे शीघ्रकृती दल इंदोरा जंगलात दाखल झाले.
विनय खगेन मंडल (४५) रा.अरुणनगर, ता.अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया असे मृताचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगल परिसरातील तलावात मासे पकडण्यासाठी आला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबासह गावकऱ्यांनी विनयचा शोध सुरू केला. बुधवारी सकाळीच गावातील तरुणांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी इंदोरा जंगलातील तलाव परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती लाखांदूर पोलीस व वनविभागाला दिली.
वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्र सहायक आर.आर. दुनेदार, वनरक्षक एस.जी. खंडागळे, जी.डी. हत्ते, आर.ए. मेश्राम, आर.एस. भोगे, एम.एस. चांदेवार यांच्यासह लाखांदूरचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज उईके, हवालदार दिलीप भोयर, पोलीस अंमलदार अनिल राठोड, रवींद्र मडावी, रजय चुटे घटनास्थळ गाठले. मृतदेहाचे डोके आणि पायच दिसल्याने, त्याचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
परिसरात पाहणी केली असता, वाघाचे पगमार्क आढळून आल्याने, विनयला वाघानेच ठार मारल्याचे स्पष्ट झाले. अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, नवेगावबांधचे सहायक वनरक्षक डी.व्ही. राऊत, अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. खोब्रागडे, साकोलीचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. भंडारा येथून शीघ्रकृती दलाचे पथक इंदोरा जंगलात वाघाचा शोध घेत आहे.
सीटी-१ वाघाने केली बारावी शिकार
भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध भागांतील जंगलात सीटी-१ या वाघाने धुमाकूळ घातला आहे. वर्षभरात या वाघाने ११ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारले. बुधवारी इंदोरा जंगलात या वाघानेच हल्ला केल्याचे पुढे आल्याने, आतापर्यंत त्याने बारा जणांना ठार केल्याची माहिती वनविभागाने दिली. इंदोरा जंगलातील ही दुसरी, तर तालुक्यातील तिसरी घटना आहे. दहेगाव जंगलात प्रमोद चौधरी (५५) तर इंदोरा जंगलात जयपाल कुंभरे (४०) यांना वाघाने ठार मारले होते.