जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये ४५०० लीटर दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:00 AM2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:26+5:30
ग्रामीण भागात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारुवर धाड टाकून पोलिसांनी ३३०४ लीटर दारु जप्त केली. तर १६ हजार ३३७ किलो मोहापास हस्तगत केला. १२५६ लीटर देशी विदेशी दारुही जप्त करण्यात आली. याप्रकरणात नऊ दुचाकी, चार चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ८१ हजार २४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दारूबंदी घोषित केल्यानंतरही जिल्ह्यात खुलेआम दारु विकली जात असून या दारुविक्रीविरुध्द जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली. लॉकडाऊनच्या २५ दिवसाच्या कालावधीत जिल्ह्यात चार हजार ५६० लीटर देशी, विदेशी आणि गावठी दारु जप्त केली. २१२ प्रकरणात २४२ जणांवर गुन्हे नोंदवून ३७ लाख ८१ हजार २४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्ह्यातील सर्व बिअरशॉपी, वाईनशॉप, परमीटरुम, बार आणि रेस्टारेंट सर्व देशी दारु दुकाने, सर्व क्लब, पानठेले, टपऱ्या व रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकण्यावर १९ मार्चपासून प्रतिबंद करण्यात आला. लॉकडाऊन संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी आदेश दिले आहेत. मात्र या काळात शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारुसह देशी विदेशी दारु विक्री केली जात होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेला दारु विक्रेत्यांविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाभरात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. १९ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत २१२ दारुसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. यात २४२ व्यक्तीविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले.
ग्रामीण भागात विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारुवर धाड टाकून पोलिसांनी ३३०४ लीटर दारु जप्त केली. तर १६ हजार ३३७ किलो मोहापास हस्तगत केला. १२५६ लीटर देशी विदेशी दारुही जप्त करण्यात आली. याप्रकरणात नऊ दुचाकी, चार चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ८१ हजार २४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख गजानन कंकाळे आणि संबंधित ठाणेदारांनी केली आहे.
अफवा पसरविणाºया चौघांवर गुन्हे
लॉकडाऊनच्या काळात अफवा पसरविल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दोन गोबरवाही पोलीस ठाण्याअंतर्गत आणि भंडारा येथे एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले तर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये १८, तुमसर मध्ये ११ आणि पवनी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर घराबाहेर फिरणाºया २५ होमक्वारंटाईन व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
कंबोज बार सिलबंद
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कंबोज बार अॅण्ड रेस्टारेंटमध्ये ३० मार्च रोजी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी तेथील नौकरी बारमालकाच्या संमतीने विदेशी दारुची विक्री करतांना आढळून आला. ६४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार सदर बार अॅण्ड रेस्टारेंटविरुध्द मालक व नौकरास अटक करण्यात आली. तसेच बारही सिलबंद करण्यात आला.
२५७ दुचाकी ताब्यात
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकरण रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाºया व्यक्तीविरुध्द पोलिसांनी जिल्हाभर मोहीम उघडली आतापर्यंत २५७ दुचाकी, पाच चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. मोटारवाहन कायद्यांतर्गत पाच हजार ७३५ केसेस करण्यात आल्या आहेत.