४७ गावांची काळजी घेणारे रुग्णालय आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:19 PM2019-02-05T22:19:41+5:302019-02-05T22:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तालुक्यातील ४७ गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले सिहोरा ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील ४७ गावांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले सिहोरा ग्रामीण रुग्णालयाला कर्मचारी तुटवड्याचे ग्रहण लागले आहे. जणू ग्रामीण आरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.
तुमसर तालुक्यात सिहोरा परिसर सर्वात मोठा आहे. ४७ गावे ग्रामीण रुग्णालयांतर्गत येतात. ७ वर्षांपुर्वी सुमारे दीड कोटींचे बांधकाम करुन ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली. रुग्णालय परिसरातच वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधण्यात आले. शासनाने वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पदाला मान्यता दिली. पंरतू नियमित वैद्यकिय अधिकाऱ्यांची अद्याप नियुक्तीच केली नाही. प्रभारी वैद्यकिय अधिकारी येथे सेवा देत आहेत. डॉ. अविनाश खुणे कामाचा ताण सहन करत रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते मुख्यालयी २४ तास राहून आपली सेवा देतात. उत्तम डॉक्टर म्हणून रुग्णात परिचीत झाले आहेत. परंतु अलीकडेच त्यांची बदली झाल्याची माहिती आहे. पर्यायी वैद्यकिय अधिकारी येथे उपलब्ध नसल्याने डॉ. खुणे येथेच थांबल्याचे सांगण्यात आले.
येथील ग्रामीण रुग्णालयात परिचारीकांची संख्या कमी आहे. उपलब्ध परिचारिका अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पद मंजूर करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, हिरालाल नागपूरे, राजु ढबाले यांनी केली आहे. मात्र सध्या स्थितीत पुरेशी यंत्रणा नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या परिसरात शेतकरी शेतमजुरांची संख्या अधिक आहे. आजारावर उपचारासाठी शहरात जाणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथील रुग्णालयाचाच आधार असतो. परंतु येथे पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने तात्पुरता इलाज करून शेवटी भंडाºयाला जाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य विभागाने सिहोरा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी आहे.
शवविच्छेदन गृह नावापुरते
सिहोरा ग्रामीण रुग्णालयात शासनाने लाखो रुपये खर्च करुन शवविच्छेदन गृह उभारले आहे. पंरतु आतापर्यंत शवविच्छेदनच झाले नाही. कुणाचा अपघाती मृत्यू झाल्यास मृतदेह घेऊन तुमसर येथे जावे लागते. त्याचा मनस्ताप रुग्णांना सहन करावा लागतो.