रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:48+5:30

देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात ...

4816 houses completed under Ramai Awas Yojana | रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण

रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण

Next
ठळक मुद्दे उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : जिल्ह्यात ९,६७५ घरकुलाचे उद्दिष्ट, कामाची गती वाढविण्याची गरज

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात शासनाने रमाई आवास योजनेतून ९६७५ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८ हजार ८८८ घरकूले मंजूर केले. त्यापैकी ४ हजार ८१६ घरकुले संबंधित लाभार्थ्यांनी पुर्ण केले आहे. म्हणजे अजूनही ४ हजार ०७२ घरे अपूर्ण आहेत.
या योजनेची अपेक्षीत उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या आवास योजनेतील घरकुल पूर्ण करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केल्याचा दावा करीत असले तरी गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ४०७२ घरकुल रखडले असल्याची धक्कादायक माहिती आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी शासनातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भाग, नगर परिषद हद्दीत संबंधित यंत्रणेमार्फत योजना राबविली जाते. ग्रामीण भागाचा विचार केल्यास साधारण एक लाख ३० हजार रुपयांचे अनुदान शासनाचे, तर १८ हजार ९० रुपयांचे अनुदान रोहयोच्या मंजुरीपोटी दिली जात असते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजना राबविली जात आहे.

रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात १०३५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १०२५ घरकुले मंजूरपैकी केवळ ९०७ घरकुल पुर्ण करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७१४० घरकुलांची उद्दिष्ट होते. त्यापैकी ६७६६ मंजूर घरकुलपैकी केवळ ३८२५ घरकुल पुर्ण झाली.
गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वर्षांपासून रखडलेल्या आवास योजनेसाठी जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर मिशन संपूर्ण घरकूल मोहीम राबविली होती. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे रखडली आहेत. गतवर्षी १५०० घरांचे उ्द्दीष्ट देण्यात आले होते.
त्यापैकी १०९७ मंजूर घरकुलापैकी केवळ ८४ घरकुल पुर्ण करण्यात आले. म्हणजे १०१३ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. प्रशासनाने घरकुलांच्या कामाबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
सदर अधिकारी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून अडचणी देखील समजून घेतात. परंतु घरकुलाची रक्कम थेट आॅनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात असते. यात पारदर्शकता असली तरी लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. कुणाचे जनधन बचत खाते आहे, तर बहुतांश घराचे मुल्यमापन केले जात नसल्याने रक्कम मिळत नाही, असे काही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
घरकुलाची रक्कम साधारण चार हप्त्यात दिली जाते. त्यात पहिल्या टप्यात २० हजार रुपये, दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ४५ हजार रुपये, तर चवथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकुण १ लाख ३० हजार रुपये दिले जाते. पहिल्या टप्यात २० हजार रुपये दिले जात असले तरी एवढ्याशा रकमेतून घरपायव्याचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना स्वत:च्या खिश्यातून रक्कम टाकावी लागते. याशिवाय पुढील रकमेसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. घराच्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीकडे सातत्याने हेलपाटे मारीत असतात.

चालु वित्तीय वर्षात उद्दिष्टच नाही
रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० या वित्तीय वर्षात शासनाने भंडारा जिल्ह्याला घरकुलांचे उद्दिष्टच दिले नाही. प्रशासनाने या योजनेंतर्गत ५४५ घरकुलांची नोंदणी केलेली आहे. या वर्षात या योजनेला उद्दिष्ट मिळाले नसल्याने अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: 4816 houses completed under Ramai Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.