बँक चोरीप्रकरणात ५ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:46+5:302021-05-06T04:37:46+5:30
लाखांदूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या परसोडी (नाग) शाखेत महिनाभरापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणात लाखांदूर पोलिसांनी पाच चोरट्यांना चंद्रपूर येथून अटक ...
लाखांदूर : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या परसोडी (नाग) शाखेत महिनाभरापूर्वी झालेल्या चोरीप्रकरणात लाखांदूर पोलिसांनी पाच चोरट्यांना चंद्रपूर येथून अटक केली. त्यांनी बँकेतून संगणक मॉडेम चाेरून नेले होते.
राजू वसंत वरंभे (५२), संकेत तेजराम उके (२७) दोघे रा.एमआयडीसी पडोली, चंद्रपूर, नवाबपूल हसन उर्फ पांडे उस्ताद रौनक अली हसन (४५) रा. आसापूर जि. बदायू उत्तर प्रदेश, दानवीर उर्फ ग्यासदु रामस्वरूप जाटव (२१) रा. हसनपूर जि. हुरीयाई उत्तर प्रदेश व देवदास रूपचंद कापगते (३७) रा. गिरोला हेटी ता. सडकअर्जुनी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गत ७ मार्चच्या मध्यरात्री परसोडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी संगणक मॉडेम चोरून नेले होते. प्रकरणी व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी तपास सुरू केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एका बँक चोरी प्रकरणातील आरोपींना चौकशीदरम्यान पोलिसांनी विचारपूस केली. तेव्हा लाखांदूर तालुक्यातील परसोडी चोरीप्रकरणी कबुली दिली. पाचही आरोपींना लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूर येथून ताब्यात घेतले.