१२५ नागरिकांना हलविले सुरक्षित स्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:58 AM2019-08-04T00:58:40+5:302019-08-04T00:59:31+5:30
पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनी तालुक्यातल आसगाव परिसरात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे ७७ घरांमध्ये पाणी शिरले. यात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने येथील १२५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
ढोरप येथे १५ घरांमध्ये पाणी शिरले असून तिथेही लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. वाही येथे २० घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय पाहुणगाव, इटगाव, कुर्झा, पालोरा व पवनी तालुक्यातील इतर गावांमध्ये अतिवृष्टीने घरांची अंशत: पडझड झाली आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीबाबत पंचनामा सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पवनी तालुक्यात आतापर्यंत अतिवृष्टीने २१२ घरांचे नुकसान झाल्याची माहिती असून कुठलीही जीवीतहानी मात्र झालेली नाही.
वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कारधा येथे वैनगंगेची धोक्याची पातळी २४५ मीटर असून आज येथे पाण्याची पातळी २४२.९० मीटर मोजण्यात आली. पाण्याचा विसर्ग ४४५६.९२ क्युसेक्स आहे. वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ४८७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवनी तालुक्यातील खापरी, शेळी आणि काकेपार येथील प्रत्येकी एका घराचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत कोणतीही जिल्ह्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
लाखनी तालुक्यात अतिवृष्टीने घरांची पडझड
लाखनी : तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. लाखनी मंडळाअंतर्गत ५९.४ मिमी, पिंपळगाव ७३.२ मिमी, पोहरा मंडळात ७७.२ मिमी तर पालांदूर मंडळात ७१.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात २४ तासात बरसलेल्या पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर दुसरीकडे रोवणीला जोम आला आहे. रोवणीसाठी महिला मजुरांची मजुरीही प्रतिदिवस ५०० रुपयापर्यंत गेली आहे. तालुक्यातील मुरमाडी तुपकर साझाअंतर्गत काही घरांची व गोठ्यांची आंशीक पडझड झाली आहे. कन्हाळगाव येथील अक्षय खोब्रागडे यांचे घर मुरमाडी येथे मिरा देशमुख यांच्याकडील जनावरांचा गोठा, प्रताप कठाणे यांचे घर, हेमराज कठाणे यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा तर रामपुरी येथे मुकुंदा भालेराव व शामराव शिंदे यांच्या घरांची पडझड झाली. या संदर्भातील वृत्ताला तहसीलदार मल्लीक विराणी यांनी दुजोरा दिला.