'त्या' ५ गावांना मे हीटमध्ये ५ लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा
By Admin | Published: May 13, 2016 12:24 AM2016-05-13T00:24:29+5:302016-05-13T00:24:29+5:30
तालुक्यात ‘मे हीट’मध्ये पाणी नाही म्हणून ओरड सुरू आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्यात आले तर दुसरीकडे डोंगरी बु.
शुभ वर्तमान : डोंगरी बु. मॉईल प्रशासन व ग्रामपंचायत डोंगरीचा स्तुत्य उपक्रम
मोहन भोयर तुमसर
तालुक्यात ‘मे हीट’मध्ये पाणी नाही म्हणून ओरड सुरू आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्यात आले तर दुसरीकडे डोंगरी बु. मॉईल प्रशासन व डोंगरी बु. ग्रामपंचायतच्या योग्य नियोजनामुळे पाच गावांना दररोज पाच लक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तालुका प्रशासनाने पाण्याचे नियोजन कसे करावे याचा येथे धडा घेण्याची गरज आहे.
तालुका मुख्यालयापासून ३५ कि़मी. अंतरावर डोंगरी बु. गाव आहे. याच गावाजवळ भारत सरकारची लोहखनिज मॅग्नीज खाण आहे. डोंगरी बु. गावासह परिसरातील पवनारखारी, गोबरवाही, बाळापूर, देवनारा या गावात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत स्वत: पाणी टंचाई दूर करण्याकरिता सक्षम नाही. तेवढा निधी गावांना मिळत नाही. प्रशासनाकडून पाणी टंचाई दूर करण्याकरिता उपाययोजना केली जाते, परंतू त्यालाही काही मर्यादा असते.
डोंगरी बु. येथे जूने तलाव आहे. जमिनीत पाण्याचा साठा येथे मुबलक आहे. जलकुंभाजवळ डोंगरी बु. मॉईल प्रशासनाने ५ कुपनलिका तयार केल्या. याकरिता ग्रामपंचायत डोंगरी बु. चे सहकार्य मॉईल प्रशासनाला मिळाले.
डोंगरी बु. मॉईलचे खाण व्यवस्थापक आर.यु. सिंग व डोंंगरी बु. चे उपसरपंच राजू तोलानी यांच्यात पाणी टंचाई विषयी चर्चा झाली. खाण व्यवस्थापक आर.यु. सिंग यांनी मॉईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या नियोजनाची माहिती दिली. मॉईल प्रशासनाने याकरिता हिरवी झेंडी दिली. नंतर ५ कुपनलिका तयार करण्यात आल्या.
या कुपनलिकेला भरपूर पाणी आहे. दररोज ५ गावांना ५ लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता या कुपनलिकेत आहे.
पाणीटंचाई असलेल्या डोंगरी बु. पवनारखारी, बाळापूर, देवनारा, गोबरवाही या गावांना मुबलक पाणी मिळत आहे. वाळवंटात पाणी शोधल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद स्थानिक नागरिकासह परिसरातील जनतेला झाला आहे. या परिसरात मॅग्नीज असल्याने परिसर खडकाळ आहे. त्यामुळे पाण्याचा साठा परिसरात कमी आहे, परुं कुपनलिकांना मुबलक पाणी असल्याने पाणी टंचाईवर येथे मात केली जात आहे. योग्य नियोजनामुळे तथा ग्रामपंचायत पदाधिकारी व खाण व्यवस्थापकांची दूरदृष्टी येथे यशस्वी झाली.