फुटलेल्या वितरिकेने ५० एकर शेती जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:07 AM2021-02-06T05:07:14+5:302021-02-06T05:07:14+5:30
तुमसर तालुक्यातील माडगी शिवारात ५२ तळ्यांची वितरिका काही दिवसांपूर्वी फुटली होती. मात्र, संबंधित विभागाने त्याची डागडुजी केली नाही. दरम्यान, ...
तुमसर तालुक्यातील माडगी शिवारात ५२ तळ्यांची वितरिका काही दिवसांपूर्वी फुटली होती. मात्र, संबंधित विभागाने त्याची डागडुजी केली नाही. दरम्यान, पिकांकरिता या तलावातील पाणी सोडण्यात आले. फुटलेल्या वितरिकेतून सुमारे ५० एकरांत पाणी शिरले. संपूर्ण शेत जलमय झाले. या शेतात लाखोरी, चना व इतर पिके होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे वितरिका दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला शेतकऱ्यांनी निवेदनेही दिले होते; परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यावर शेतकऱ्यांवर संकट ओढवल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी केला आहे.
बॉक्स
नुकसानभरपाईसाठी आंदोलनाचा इशारा
शेतात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तात्काळ पंचनामे करून संबंधित विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मदत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशारा के.के. पंचबुद्धे आणि माडगीचे माजी उपसरपंच फुकट हिंगे यांनी दिला आहे. नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.