चार गावांतील फेरफारची ५० प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:24 AM2017-06-23T00:24:04+5:302017-06-23T00:24:04+5:30
वाहनी तलाठी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार गावातील ५० फेरफारची प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित पडून आहेत.
कुलूप ठोकण्याचा इशारा : वाहनी तलाठी कार्यालयाचा कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वाहनी तलाठी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या चार गावातील ५० फेरफारची प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित पडून आहेत. स्थानिक परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून त्यांच्यात प्रचंड असंतोष व्याप्त आहे. संबंधित समस्या तात्काळ निकाली न काढल्यास पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
वाहनी येथे तलाठी कार्यालय असून त्या अंतर्गत वाहनी, परसवाडा, पिपरी चुन्नी, मांडवी या गावातील शेतकऱ्यांची फेरफारची ५० प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत.
एक वर्षापासून येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. आल्यापावली शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासनाने वाहनी येथे तलाठी कार्यालय सुरू केले. त्याचा उपयोग काय असा प्रश्न येथे शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
नियमानुसार फेरफारची नोंदणी घेण्यात समस्या कोणती. केवळ शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार येथे मागील एक वर्षापासून सुरू असल्याचा आरोप तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केला असून येत्या आठ दिवसात प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा तक्रारीतून दिला आहे.
प्रलंबित प्रकरणे निकाली न काढणाऱ्या तलाठ्याला मंडळ अधिकाऱ्यांनी येथे जाब विचारण्याची गरज आहे.