मामा तलावासाठी ५० कोटींचा निधी मंजूर
By Admin | Published: March 22, 2016 12:45 AM2016-03-22T00:45:57+5:302016-03-22T00:45:57+5:30
तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते.
भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी येथील अनेक मामा तलावांमधून सिंचन होत नव्हते. या तलावांचे पुनरुज्जीवन करून त्यांना सिंचनक्षम करण्यासाठी पहिल्यांदाच कालबद्ध नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून २०१६-१७ मध्ये या तलावांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी २१ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात १३३० मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यातील भूस्तर रुपांतरीत प्रकारचा असल्यामुळे येथे कितीही पाऊस पडला तरी जमिनीत पाणी पडण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे शाश्वत सिंचनाकरिता पावसाचे पाणी तलावांवर साठवून ठेवणे आवश्यक ठरते. जिल्ह्यात धानाचे प्रमुख पीक आहे. मात्र पावसाने दडी मारली की पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. ही बाब लक्षातयेऊन गोंड राजाच्या कालखंडात मामा तलावांची निर्मिती झाली. नंतर हे तलाव ब्रिटीशांनी मालगुजार लोकांना हस्तांतरीत केले.
सध्या जिल्ह्यात १४६२ मामा तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ५८९९.५८ हेक्टर आहे. मागील अनेक वर्षापासून तलावाचे पुनरुज्जीवन न झाल्याने सिंचनक्षमतेत मोठी घट झाली आहे. या तलावांचे नूतनीकरण केल्यास सिंचनक्षमता वाढून पिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात घेवून यावर्षी मामा तलाव दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात २७८ तलावांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी ५०.५१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. मामा तलावांची पाणी साठवण क्षमता वाढल्या त्यामध्ये मत्स्य व्यवसाय, शिंगाडा यासह जोडधंद्यासह मदत होईल. ३० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या २३१ तलावांचे व १०० हेक्टर सिंचन क्षेत्र असलेल्या ४७ तलावांची दुरुस्ती पहिल्या टप्प्यात होणार आहे. (नगर प्रतिनिधी)