मांढळ, सुकळीत ५० ‘टमरेल’ जप्त
By admin | Published: February 9, 2017 12:27 AM2017-02-09T00:27:19+5:302017-02-09T00:27:19+5:30
घरी शौचालय असतानाही उघड्यावर जाण्याची जणू स्पर्धाच ग्रामीण भागात दिसून येते. यामुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
गुडमॉर्निंग पथकाची कारवाई : तुमसर तालुक्यात उघड्यावर जाणाऱ्यांमध्ये भरली धडकी
भंडारा : घरी शौचालय असतानाही उघड्यावर जाण्याची जणू स्पर्धाच ग्रामीण भागात दिसून येते. यामुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी गुडमॉर्निंग पथकाने कंबर कसली आहे. आज तुमसर तालुक्यातील मांढळ व सुकळीत या पथकाने चक्क उघड्यावर जाणाऱ्यांचे ५० ‘टमरेल’ जप्तीची कारवाई केल्याने मोठी तारांबळ उडाली.
तुमसर तालुक्यातील मांढळ व सुकळी हे गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. मात्र काही उपद्व्यापी नागरिकांमुळे या गावाला हागणदारीमुक्तीच्या योजनेपासून दूर राहावे लागत आहे. दरम्यान जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्वत्र उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भल्या पहाटेच गुडमॉर्निंग पथक गावात दाखल होत आहे. यावेळी उघड्यावर जाणाऱ्यांना समजवून सांगून त्यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांच्यासोबत ‘गांधीगिरी’चा मार्ग अवलंबिण्यात येत आहे.
मांढळ व सुकळी या गावात मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरी शौचालय बांधले आहे. काही नागरिकांकडे शौचालय नाही. मात्र ज्यांनी शौचालय बांधले असे नागरिकही शौचालय नसलेल्यांसोबत उघड्यावर शौचास जात आहेत. शौचालय असतानाही उघड्यावर जात असल्यामुळे गाव योजनेपासून वंचित राहू शकते. सदर गाव हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या गुडमॉर्निंग पथकाने आज पहाटेच हे दोन्ही गाव गाठले.
गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक गटविकास अधिकारी गायधने यांच्या नेतृत्वात हे पथक मांढळ येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी दोन गट बनवून दुसरा गट सुकळीला पाठविला. दरम्यान मांढळ येथे अंधाराचा फायदा घेत हातात लोटे घेऊन उघड्यावर शौचास जाण्यास निघाले. यावेळी पथकाने त्यांना थांबवून गुलाबपुष्प दिले व त्यांना उघड्यावर जाण्याऐवजी शौचालयाचा वापर करण्याचा सल्ला दिला. दरम्यान काहींनी या पथकाचे मनावर न घेतल्याने त्यांचे लोटेच जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. हीच परिस्थिती सुकळी येथेही घडली. जप्त केलेले लोटे पथकाने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लटकवून ठेवले आहेत.
या पथकात राजेश येरणे, अंकुश गभणे, घटारे, पल्लवी तिडके, शशीकांत घोडीचोर, हर्षाली ढोके, पौर्णिमा डुंभरे, साठवणे, आर.सी. मेश्राम, थाटमारे, पोलीस कर्मचारी मंजू बांते, रवी आडे, सरपंच लक्ष्मीकांत सेलोकर, सरपंच भाऊलाल बांडेबुचे, उपसरपंच शामकला भोयर, उपसरपंच धनपाल शेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
या मार्गावर केली नाकाबंदी
उघड्यावर शौचास जाण्याची प्रक्रिया पहाटेपासून सुरु होणार असल्याने पथकाने मांढळ येथे कुशारी, सुकळी, रोहा, रेल्वे स्टेशन, शेताकडील मार्ग व नहरालगतच्या मार्गावर पाळत ठेवली. तर सुकळी येथे मांढळ, रोहा, बेटाळा, चारगाव व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पाळत ठेवून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची अक्षरश: नाकाबंदी करून त्यांना यापासून परावृत्त केले. यावेळी किमान ५० टमरेल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली.