स्टेट बँकेला ५ हजारांचा दंड

By Admin | Published: January 25, 2017 12:34 AM2017-01-25T00:34:50+5:302017-01-25T00:34:50+5:30

बँकेत कार्यरत असताना आरबीआय नागपुरच्या शाखेत १७ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जमा केल्याचा ठपका ...

5000 fine for SBI | स्टेट बँकेला ५ हजारांचा दंड

स्टेट बँकेला ५ हजारांचा दंड

googlenewsNext

जिल्हा ग्राहक मंचचा आदेश : सूचना न देता कापली रक्कम
भंडारा : बँकेत कार्यरत असताना आरबीआय नागपुरच्या शाखेत १७ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जमा केल्याचा ठपका ठेवून कर्मचाऱ्याच्या खात्यातून तेवढी रक्कम सूचना न देता कापण्यात आली. या प्रकरणी त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेत न्याय मागितला. प्रकरणाची शहानिशा करून जिल्हा ग्राहक मंचाने सदर स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा भंडाराला ५ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माहितीनुसार, येथील सत्कार नगरातील रहिवासी वसंतराव नेवारे हे भंडारा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते बँकेत वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. ३० जून २०१५ रोजी ते सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी ७ फेब्रुवारी २०१५ रोजी वसंतराव नेवारे यांनी बँकेतील १२ कोटी ९९ लक्ष २५ हजार रुपयांच्या खराब नोटा रिझर्व बँक आॅफ इंडिया नागपूर येथे नेऊन जमा केल्या. त्यावेळी आरबीआयने तपासणी करून त्या स्वीकारल्या. नोकरीत असेपर्यंत सदर रकमेबाबत स्टेट बँक किंवा आरबीआयकडून कुठलीही तपासणी किंवा शहानिशाबाबत पाचारण करण्यात आले नाही.
सबब वसंतराव नेवारे व त्यांची पत्नी प्रभावती यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया भंडाराच्या शाखेत ११२४४८०७४८१ असे बचत खाते आहे. या दरम्यान बँकेने त्यांच्या बचत खात्यातून १७ हजार ५०० रुपये कपात केले. तसेच ही रक्कम आरबीआयमध्ये जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी १७ हजार ५०० रुपयांच्या नोटा बनावटी असल्याचे कारण दिले.
विशेष म्हणजे सदर रक्कम खात्यातून कपात केल्याची सूचनाही नेवारे यांना देण्यात आलेली नाही. याबाबत नेवारे यांनी बँकेशी संपर्क साधून सदर रक्कम परत देण्याची मागणीही केली. मात्र ती मागणी पूर्ण न झाल्याने शेवटी नेवारे यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने प्रकरणाची शहानिशा करून व दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले.
यात नेवारे यांनी सादर केलेले पुरावे वस्तूस्थितीला ग्राह्य धरून त्यांची तक्रार मंजूर करण्यात आली. यात शेवटी ग्राहक मंचाने आदेश देत तक्रारकर्त्याच्या बचत खात्यात १७ हजार २५० रुपयांची रक्कम २३ जुलै २०१५ पासून ९ टक्के व्याजासकट देण्यात यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी ३ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचा आदेशही ग्राहक मंचाने सुनावला. आदेशाची पूर्तता एक महिन्याच्या आत करण्याचेही आदेश देण्यात आले. सदर निर्णय ग्राहक मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले यांनी दिला. तक्रारकर्त्याकडून अ‍ॅड.एम.जी. हरडे, अ‍ॅड.वाय.जी. निर्वाण यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: 5000 fine for SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.