जीवनदायी आरोग्य योजनेचा ५ हजार रूग्णांना मिळाला लाभ
By admin | Published: April 7, 2017 12:31 AM2017-04-07T00:31:25+5:302017-04-07T00:31:25+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा
आज जागतिक आरोग्य दिन : उपचारासाठी १६.१६ कोटी रूपये मंजूर
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा मागील तीन वर्षामध्ये जिल्ह्यातील ५ हजार ३९८ रूग्णांनी लाभ घेतला आहे. त्यावर शासनाचा १६ कोटी १६ लाख ६६ हजार ८३० रूपयांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील हृदयरूग्ण, अपघातील रूग्ण, कॅन्सर, किडनीचे आजार, लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, जळीत रूग्ण, पोटाच्या शस्त्रक्रिया, फुफ्फूसाचे आजार, प्लॅस्टीक सर्जरी, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया व श्रवणयंत्रे आदी आजाराच्या रूग्णांचा समावेश आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून राज्यात लागू झाली. जिल्ह्याातील पात्र लाभार्थ्यांनी विविध गंभीर व अतिगंभीर आजारावर शस्त्रक्रिया व उपचार करुन घेतले आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा कमी आहे, अशी कुटूंबे किंवा ज्या कुटूंबाकडे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबे या योजनेचे पात्र लाभार्थी असून ९७१ शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १ डिसेंबरच्या शासन निणर्यानुरुप राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नवीन स्वरुपात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने प्रस्तावित आहे. प्रस्तावित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंमलात आणण्याची प्रक्रीया सद्या चालू असल्यामुळे २१ नोव्हेंबर २०१६ पासून शासनाने पुढील आदेश येईपर्यंत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना चालू राहील व जिल्ह्याामध्ये शासकीय जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय तुमसर व तीन खाजगी अशा ५ रूग्णालयात योजनेतील पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय गटकुळ यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
या योजनेतून मागील तीन वर्षात जिल्ह्यातील नोंदणीकृत रूग्णालयाद्वारे मोफत तपासणी करण्याकरीता ७० आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २० हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली. या योजनेसाठी पात्र रूग्णांना पुढील सेवेकरीता संबंधित रूग्णालयामध्ये संदर्भित करण्यात आले आहे.
- डॉ. संजय गटकुळ, जिल्हा समन्वयक, आरोग्य योजना.