शेळी पालनाच्या नावावर ५३ लाखांनी गंडविले
By admin | Published: July 6, 2016 12:29 AM2016-07-06T00:29:02+5:302016-07-06T00:29:02+5:30
शेळी पालनाचा व्यवसाय करून अल्पावधीत लाखो रुपयांची कमाई करता येईल अशी नागरिकांना भुलथाप देण्यात आली.
सांगलीच्या कंपनीचा प्रताप : जागृती अॅग्रो फ्रुट्स विरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा : शेळी पालनाचा व्यवसाय करून अल्पावधीत लाखो रुपयांची कमाई करता येईल अशी नागरिकांना भुलथाप देण्यात आली. यातून भंडारा शहरातील अनेक नागरिकांना सांगली येथील जागृती अॅग्रो फ्रुट्स प्रा.लि. या कंपनीने सुमारे ५३ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली येथील जागृती अॅग्रो फ्रुट्स लि. या कंपनीने खमारी बुटी येथे अर्धलिज पद्धतीने शेळी पालनाचा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पात एका शेळीची गुंतवणूक केल्यास १४ महिन्यानंतर पाच हजार रुपये व १ लाख रुपये गुंतवणूक केल्यास १४ महिन्यानंतर प्रत्येकी ८ लाख रुपये मिळतील असे आमिष कंपनीने नागरिकांना दाखविले.
या कंपनीचे अल्पावधीतच जिल्ह्यात मोठे जाळे पसरविले. कमी पैशात मोठा आर्थिक लाभ होत असल्याने नागरिकही या प्रलोभनाला बळी पडले. दरम्यान काही नागरिकांना या बाबत संशय आल्याने त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
या प्रकरणी पैशाने फसगत होत असल्याचे लक्षात येताच विद्यानगर येथील रामभाऊ खोब्रागडे यांनी त्यांच्यासह अन्य पाच व्यक्तींची ५३ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार कारधा पोलिसात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीविरुद्ध ४२०, ४०६, ४६७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)