५३६ सहकारी संस्था अवसायनात
By admin | Published: January 1, 2015 10:57 PM2015-01-01T22:57:40+5:302015-01-01T22:57:40+5:30
‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रिद वाक्य घेऊन सुरु असलेल्या जिल्ह्यातील ५३६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवासायनात निघाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र लयाला गेल्याचे चित्र आहे.
सहकार क्षेत्र लयाला : अनेक संस्थाची माहिती सादर करण्यास टाळाटाळ
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
‘विना सहकार, नही उद्धार’ हे ब्रिद वाक्य घेऊन सुरु असलेल्या जिल्ह्यातील ५३६ सहकारी संस्था विविध कारणांमुळे अवासायनात निघाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र लयाला गेल्याचे चित्र आहे. विविध कारणांमुळे या संस्था अवसायनात निघाल्या असून लवकरच या संस्थावर अंतिम कार्यवाही होणार आहे.
जिल्ह्यात १ हजार ६८५ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अर्बन बँक, पतसंस्था व कर्मपत, विकास संस्था, गृहनिर्माण संस्था, मजूर संस्था, औद्योगिक संस्था व इतर संस्थाचा समावेश आहे. मात्र, ५३६ संस्थांनी आॅनलाईन ताळेबंद सादर न करणे, कर्जाची रक्कम अदा न करणे, नोंदी न ठेवणे, नियमित कामकाज न चालविणे, केवळ नोंदणी करुन कोणतेच काम न करणे अशा कारणांमुळे या संस्था अवसायनात निघाल्या आहेत.
जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यात ३७४, मूल १०७, सावली ८९, नागभीड १५०, सिंदेवाही १०१, चिमूर ११७, वरोरा १४३, भद्रावती ९८, ब्रह्मपुरी १७२, बल्लारपूर ६४, राजुरा ८९, गोंडपिंपरी ६६, कोरपना ६३ व पोंभुर्णा तालुक्यात ५२ सहकारी संस्था आहेत. यात ५१ संस्थांचे कलम १८ अंतर्गत विलीनीकरण करण्यात आले आहे.
सहकारी संस्थाना आॅनलाईन ताळेबंद सादर करण्यासाठी दोन ते तीन वेळा मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थानी याकडे दुर्लक्ष करुन आॅनलाईन ताळेबंद सादर केले नाही. अनेक संस्था जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडे माहिती सादर करीत नाही. त्यामुळे त्या संस्थेची केवळ नोंदणी कार्यालयात असते. संस्थेला वारंवार पत्रव्यवहार करून संस्थेची माहिती मागवावी लागत असते.
हा प्रकार अनेक संस्थामध्ये सुरु असून संस्थेची नोंदणी करणे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या रक्कमेची कामे मिळवण्याचा गोरखधंदा सुरु आहे. सहकारी संस्थाच्या नावावर कर्ज काढून अनेकांनी आपली दिवाळी साजरी केली आहे. अशा दिवाळीखोरांचा जिल्हा प्रशासनाकडून शोध सुरु आहे.