शेतकरी अपघात विमा योजनेची ५४ प्रकरणे अडकली त्रुटीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:42+5:302021-03-04T05:07:42+5:30
राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास ...
राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी कुटुंबांसाठी दिलासा देणारी आहे. शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळण्याची यात सोय आहे. योजनेत पूर्वी फक्त खातेदार शेतकरी होते; मात्र शासनाने त्याची व्याप्ती वाढवून शेतकरी कुटुंबालाही विमाछत्र दिले आहे. जिल्ह्यात २०१६ ते १७ पासून आतापर्यंत ३४५ प्रस्ताव आलेले आहेत. त्यापैकी अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे.
कोणाला किती मिळते मदत?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत वेगवेगळ्या अपघातात वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळते. अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत देण्यात येते. दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते.
प्रस्ताव प्रलंबित का?
विविध त्रुटींमुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहात आहेत. सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला यासह विविध कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असतात; परंतु कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून येत असल्याने प्रस्ताव प्रलंबित राहतात.
सर्वाधिक प्रकरणे
शेतकरी अपघात विमा योजनेत सर्वाधिक प्रकरणे ही विजेचा धक्का, सर्पदंशाची आहेत. त्यानंतर रस्ता अपघात व वाहन अपघाताची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
२०१६-१७ ते २०१९-२० या वर्षातील आढावा
दाखल प्रस्ताव ३४५
मंजूर १७८
नामंजूर ५४
प्रक्रियेत ८५