एनएमएमएस परीक्षेत तालुक्यातून ५४ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:33+5:302021-07-31T04:35:33+5:30
शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक मागास व दुर्बल घटकांतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा ...
शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक मागास व दुर्बल घटकांतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा तालुक्यातील विविध शाळेंतर्गत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तब्बल ३५४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सदरची परीक्षा तालुक्यातील २ केंद्रांवर घेण्यात आली होती. या केंद्रांत लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय व बारव्हा येथील महात्मा गांधी विद्यालयांचा समावेश होता.
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये असे वार्षिक १३ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. सदरची शिष्यवृत्ती सलग चार वर्षे दिली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच गत २६ जुलै रोजी जाहीर झाला असून, तालुक्यातील २५ शाळेतील ३५४ विद्यार्थ्यांपैकी १३ शाळांतील ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उर्वरित १२ शाळांतील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १६ विद्यार्थी उत्तीर्ण होत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.