तीन वर्षांपासून ५५ मजूर
By admin | Published: March 31, 2017 12:30 AM2017-03-31T00:30:26+5:302017-03-31T00:30:26+5:30
येथील ग्रामपंचायत अस्तित्वात असताना करण्यात आलेल्या रोजगार हमी कामाची मजुरी मागील तीन वर्षांपासून
प्रकरण रोजगार हमी योजनेचे : साकोली तालुक्यातील प्रकार
साकोली : येथील ग्रामपंचायत अस्तित्वात असताना करण्यात आलेल्या रोजगार हमी कामाची मजुरी मागील तीन वर्षांपासून अजूनपर्यंत मिळाली नसल्याने मजुरावर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मजुरांनी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार याची शाश्वती नाही.
साकोली ग्रामपंचायत अस्तित्वात असतानी २०१४ ला वनविभाग कार्यालय साकोली अंतर्गत नर्सरी येथे ५५ मजुरांना रोजगार हमी योजने अंतर्गत १७५ रूपये प्रतिदिवस मजुरीसाठी बोलावण्यात आले होते. सदर काम हे सतरा दिवस चालले होते. मात्र अचानक साकोली ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. त्यामुळे काम तात्काळ बंद करण्यात आले होते.
त्यावेळी सहा दिवसाची मजुरी देण्यात आली होती व उर्वरित अकरा दिवसाची मजुरी थांबविण्यात आली यानंतर वनअधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही तर मजुरांनीही बरेचदा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे चकरा मारल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र मजुरांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. एकीकडे राज्य व केंद्र शासन लोकाभिमुख योजना अंमलात आणते तर दुसरीकडे लोकावरच अन्याय करते यात बीचारे मजुर अन्यायाला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)
डांभेविरलीचे सरपंच पायउतार
लाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली ग्रामपंचायत येथील सरपंच वासुदेव बुराडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव २९ मार्च रोजी तहसीलदार तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. डांभेविरली येथील सरपंच वासुदेव बुराडे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने काम करणे, ग्रामपंचायतीमध्ये घेतलेल्या ठरावाचे अंबलबजावणी न करणे, गावातील अतिक्रमण धारकांना शह देणे, यासह अन्य आरोप ग्रामपंचायत सदस्यानी लावले होते. त्यामुळे येथील सदस्य यांनी अविश्वास ठराव घेऊन सरपंच वासुदेव बुराडे यांना पदावरून खाली करण्यासंबंधी तहसीलदार तोडसाम यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदार तोडसाम यांनी २९ मार्च रोजी अविश्वास ठराव बैठक बोलावली होती. (शहर प्रतिनिधी)