५,७६८ रुग्णांनी घेतला जन आरोग्य योजनेचा लाभ
By Admin | Published: July 1, 2017 12:28 AM2017-07-01T00:28:34+5:302017-07-01T00:28:34+5:30
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा (जुनी राजीव गांधी जीवनदायी योजना) जिल्ह्यातील ५ हजार ७६८ रुग्णांनी लाभ घेतला आहे.
१७ कोटी १६ लक्ष रुपये मंजूर : गंभीर आणि किरकोळ ९७१ आजारांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेचा (जुनी राजीव गांधी जीवनदायी योजना) जिल्ह्यातील ५ हजार ७६८ रुग्णांनी लाभ घेतला आहे. यासाठी शासनाने १७ कोटी १६ लक्ष ५१ हजार रुपये मंजूर केले आहेत. या योजनेत ९७१ गंभीर आणि सर्वसाधारण आजारांचा समावेश आहे.
भंडारा तालुका- १६४६, लाखांदूर तालुका- ४३६, लाखनी तालुका-७११, मोहाडी तालुका- ७३९, पवनी तालुका- ७९०, साकोली तालुका- ५९६ व तुमसर तालुक्यातील ८५० रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी शासनाव्दारे विमा कंपनीमार्फत १७ कोटी १६ लाख ५१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सामान्य माणसाला आरोग्य सेवा देणारी ही अतिशय चांगली योजना आहे.
या योजनेकरीता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणारे पिवळे, केशरी, अन्नपूर्णा व अंत्योदय अन्न योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटूंबे असणे आवश्यक आहे. या योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक प्रती कुटुंब १ लाख ५० हजार पर्यंत व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २.५० लाख पर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत रुग्णालयातील खाटा, शस्त्रक्रीया, भूल सेवा, तज्ञ डॉक्टाच्या सेवा, निदान सेवा, शुश्रुषा सेवा, आवश्यक औषधी, मोफत भोजन, एक वेळचा परतीचा प्रवास पात्र असणाऱ्या कुटूंबाना महाराष्ट्रात कोठेही नोंदणीकृत असणाऱ्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेवू शकतात.
या योजनेमध्ये अतिगंभीर असे मेंदू, हृदय, यकृत, किडनी, अस्थिरोग, जन्मजात विकृती, कर्करोग, लहान मुलाचे आजार, डायलिसीस इत्यादी आजारावर उपचार केले जातात. रुग्णास या योजनेचा लाभ घेण्याकरीता मूळ शिधापत्रिका व शासनमान्य ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड) नोंदणीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या योजनेच्या आरोग्यमित्रांकडे दाखवून नोंदणीकृत करुन घेणे आवश्यक आहे. गंभीर रुग्णाकरीता तातडीच्या प्रसंगी भरती झाल्यास ७२ तासांमध्ये आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे.
भंडारा जिल्हयामध्ये एकूण चार रुग्णालयाचा या योजनेत समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, नाकाडे हॉस्पिटल व रंगारी हॉस्पिटल भंडारा. रुग्णांच्या सोयीकरीता व अडीअडचणीच्या वेळी मदतीकरीता नि शु:ल्क दूरध्वनी सेवा आणि टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचे कार्यालय महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, पहिला मजला, रुग्णालय उपहार गृहावर, एन.एस.व्ही. बिल्डींग जिल्हा रुग्णालय भंडारा येथे आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले आहे.