भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ५७८०६ शेतकरी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:40 AM2024-09-23T11:40:09+5:302024-09-23T11:40:54+5:30
Bhandara : जिल्ह्याला अतिवृष्टी व पुराचा फटका
भंडारा : जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत चांगले आहे. मात्र कधीकाळी अधिक बरसणारा पाऊस अन्नधान्यासाठी नुकसानदायक ठरतो. जिल्ह्यात गत महिनाभरात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हाभरातील ५० हजार ८०६ शेतकरी बाधित झाले आहेत. स्वतःला सावरत नव्या उमेदीने बळीराजा कामाला लागला आहे.
जिल्ह्यात मिलिमीटर १३३० सरासरी इतका पर्जन्यमानाचे प्रमाण आहे. अन्य जिल्ह्याच्या तुलनेने भंडारा जिल्ह्यात बरसणारा पाऊस बऱ्यापैकी व समाधानकारक असतो. परंतु, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्याला अतिवृष्टी व पुराचा सामना करावा लागला. भंडारा जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान आहे. ध्यानाला बऱ्यापैकी पाण्याची गरज असते. अपेक्षेनुरूप पाऊस बरसला तर धानाचे उत्पादन हे विक्रमी होत असते. अतिपावसामुळे धानाला मारक ठरतो. रोवणी झाली नाही तेच जुलै महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यात होत्याचे नव्हते झाले.
आता हातात आलेले पीक अक्षरशः पाण्यात बुडाले व सडलेही. त्यामुळे नुकसान झाले. पुन्हा ८ व ९ सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे धान अक्षरशः जमीनदोस्त झाले, अनेक घरांची पडझड झाली. वीज कोसळल्यामुळे काही जनावरेही मृत्युमुखी पडली. या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ५७ हजार ८०६ शेतकरी बाधित झाले.
नुकसानग्रस्त हेक्टरवर नजर घातल्यास त्याचीही आकडेवारी मोठी आहे. मात्र, प्रशासनाच्या महसूल व कृषी विभागाची जिथे नजर गेली ते अंदाजित पकडण्यात आले. लहानसहान नुकसान नजरेआड आहे. त्याची भरपाई कधीही न मिळणारी आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान
१९ ते २९ जुलै २०२४ ९ ते १२ सप्टेंबर
तालुका बाधित क्षेत्र बाधित शेतकरी बाधित क्षेत्र बाधित शेतकरी
भंडारा १३४३.५ २६७९ १६९६ ३०९२
मोहाडी १७६९.६ ४१८१ ६८६.५ १२७२
तुमसर १०० २७५ १०० २५५
पवनी १२७६९.५० २५८१७ ५९५ १२४०
साकोली १५७ ५०४ ४७० १३१४
लाखनी ५२.९ १३१ ४८६ ६६३
लाखांदूर ७०६८ १५६१० ३०८ ८५३
एकूण २३२६०.५० ४९१९७ ४३४१.५० ८६८९
नगदी पिकांकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात धान प्रमुख पीक असल्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचीच लागवड करतात. परंतु, नगदी पिकाकडे बहुतांशी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आहे. बोटांवर मोजण्याइतके शेतकरी नगदी पीके घेतात. त्यातही प्रचंड नफा आहे. परंतु, शासनाच्या कृषी विभागांतर्गत अन्य योजनांचा लाभ घेत बळीराजा आपली उन्नती साधू शकतो, याकडे कदाचित कृषी विभाग सांगायला फेल ठरला की काय, असे जाणवते.