हिवतापाचे ६३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’
By admin | Published: October 9, 2015 01:18 AM2015-10-09T01:18:05+5:302015-10-09T01:18:05+5:30
कीटकजन्य आजाराबाबत ज्या विभागाच्या खांद्यावर धुरा आहे त्या जिल्हा हिवताप विभागाच्या कार्यालयात दिव्याखाली अंधार आहे.
आरोग्य विभागाचा कारभार : जनजागृती नावापुरतीच, दिव्याखाली अंधार
इंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर भंडारा
कीटकजन्य आजाराबाबत ज्या विभागाच्या खांद्यावर धुरा आहे त्या जिल्हा हिवताप विभागाच्या कार्यालयात दिव्याखाली अंधार आहे. एकीकडे मागील सहा महिन्यात मलेरियाचे ६३ रुग्ण पॉझीटीव्ह असताना जिल्ह्यात जनजागृती खरच सपेशल यशस्वी ठरली काय? हा खरा सवाल आहे.
जिल्हा हिवताप विभागाकडे कीटकजन्य आजाराबाबत नियंत्रण व जनजागृतीचे कार्य आहे. मागील सहा महिन्यात या विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यातून एकुण २ लक्ष ८१ हजार ५२८ जणांचे रक्त नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत २ लक्ष ६६ हजार ४१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ नमुने पॉझीटीव्ह आढळले. तसेच डेंग्यूचे चार रुग्ण पॉझीटीव्ह आढळले. हे रुग्ण लाखांदूर तालुक्यातील मोहरणा प्राथमिक आरोग्य केंद्र व साकोली तालुक्यातील सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणीकृत आहेत. मलेरियाच्या एकुण पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ‘पीव्ही मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या ४३ असून ‘पीएफ मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या २० आहे. ‘मिक्स मलेरिया’चे रुग्ण भंडारा जिल्ह्यात ० आहेत. विशेष म्हणजे या विभागांतर्गत जिल्ह्यातील ६५ गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींना फॉगींग मशीन देण्यात आल्या आहेत. विषेशत: रुग्णसंख्या आढळून आलेल्या गावांमध्ये दक्षता घेण्यात येते.