जिल्ह्यातील पहिली ते चौथीचे 65,259 विद्यार्थी होणार वर्गोन्नत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:32+5:302021-05-07T04:37:32+5:30
भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. कुठलेही क्षेत्र या महामारीपासून अलिप्त राहिले नाही. शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात ...
भंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. कुठलेही क्षेत्र या महामारीपासून अलिप्त राहिले नाही. शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. गतवर्षी तब्बल आठ महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्या. त्यातही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. परिणामी, शासनाने सर्वांनाच वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भंडारा जिल्ह्यातील ६५ हजार २५९ विद्यार्थी वर्गोन्नत केले जाणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारित प्राथमिक शाळांची संख्या ७५० च्या वर आहे. याशिवाय खासगी शाळांची संख्याही भरपूर आहे. कोरोना उद्रेकामुळे गतवर्षी शाळा उघडल्याच नाहीत.
नर्सरी ते इयत्ता चवथीपर्यंतचे विद्यार्थी घरीच होते. त्यांच्या शिक्षणाबाबत पालकांनाही चिंता भेडसावत आहे. ही बाब आजही कायम असून छकुल्यांची शाळा एकदाची केव्हा सुरू होईल याबाबत विचारमंथन सुरू आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्या तरी वर्षभर विद्यार्थी घरीच असल्याने त्यांच्या शैक्षणिक विद्वत्तेत खंड पडला यात शंका नाही.
प्रगतीपत्रकात होणार काही बदल
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात थोडाफार बदल पाहायला मिळणार आहे. यात विद्यार्थ्यांना श्रेणीऐवजी वर्गोन्नत असा उल्लेख केला जाणार आहे. याशिवाय उंची, वजन, श्रेणी, उपस्थिती यावरही बदल करण्यात येणार आहे. एकूणच प्रगतीपत्रकातील हा बदल विद्यार्थ्यांसह पालकांसाठी नवीनच बाब आहे. दरम्यान यावर्षीही कोरोनामुळे अशीच स्थिती दिसत आहे.
मागील वर्षी शाळा सुरू होईल, असे वाटत होते. दिवाळीनंतर माझ्या मोठ्या भावाची शाळा सुरू झाली. त्यामुळे आम्हाला आस निर्माण झाली होती. मात्र, कोरोनामुळे शाळा उघडलीच नाही. घरी किती वेळ घालवायचा, कोणता अभ्यास किती वेळ करायचा, असाही प्रश्न निर्माण झाला. मन रमविण्यासाठी चित्र बनविते. मात्र, त्यावर दाद देणारे शिक्षकही दिसेनासे झाले आहेत. या कंटाळवाण्या स्थितीतून आम्हाला बाहेर पडायचे आहे. शाळा लवकर सुरू व्हायला हव्यात.
-समृद्धी कुंभारे, विद्यार्थिनी
कोरोनामुळे शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले. आईबाबांना नेहमी विचारतो की, कोरोना केव्हा संपणार आहे. लवकरच संपेल व तुझी शाळा सुरू होईल, असे मला सांगत असतात. शाळेची आता खूप आठवण येत आहे. शिक्षक, माझे सोबतीचे मित्रही खूप आठवतात. शाळेत बसून डबापार्टीही खूप आठवते. घरात बसून खूप कंटाळवाणे वाटत आहे. बाहेरही जाऊन खेळण्यास मनाई असल्याने आमचा हिरमोड होत आहे.
-हिमांशू गभणे, विद्यार्थी
गतवर्षी शाळेचे तोंडही पाहायला मिळाले नाही. यावर्षीही शाळा सुरू होणार की नाही, असे दिसत आहे. कोरोनामुळे आमची मित्रमंडळीही भेटू शकली नाही. मी चौथीची विद्यार्थिनी असून वर्गात शिकविणारे विषय पटकन लक्षात राहायचे. मात्र, आता घरच्या घरीच असल्याने कितीही अभ्यास केला तरी त्याविषयी आवड निर्माण होत नाही. आईवडील माझ्यासोबत वेळ घालवत असले तरी शाळेची ओढ कायम आहे. यावर्षी तरी शाळा उघडायला हवी, अशी माझी इच्छा आहे.
-वैष्णवी लेंडे, विद्यार्थिनी
स्वाध्याय उपक्रम
शाळा बंद असल्याने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वाध्याय उपक्रम राबविण्यात आला होता. यात विविध विषयांमधील सराव घरीच करून ते शाळेत सबमीट करण्यात सांगण्यात आले होते. ही बाब यावर्षीही विद्यार्थ्यांसाठी नवीन ठरली.