पालिकेत ६६ लाख रूपयांचा कर जमा
By admin | Published: November 15, 2016 12:25 AM2016-11-15T00:25:47+5:302016-11-15T00:25:47+5:30
नोटाबंदीच्या धक्कातंत्राचा काहीसा फटका सामान्यजणांना बसत असला तरी ५००-१००० च्या नोटांनी नगरपालिकेला सुगीचे दिवस आले आहेत.
पालिकांना ‘अच्छे दिन’ : तीन दिवसांत स्वेच्छेने विक्रमी कर वसुली
भंडारा : नोटाबंदीच्या धक्कातंत्राचा काहीसा फटका सामान्यजणांना बसत असला तरी ५००-१००० च्या नोटांनी नगरपालिकेला सुगीचे दिवस आले आहेत. मागील चार दिवसांत नगर परिषद व नगर पंचायतींना करापोटी ६६ लाख रूपयांची वसुली झाली आहे. ही वसुली रात्रीपर्यंत ७० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री १२ वाजतापासून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थासह महावितरण, सिंचन पाणीपट्टी करासाठी जुन्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्वीकारले जातील, असा निर्णय घेतला. त्यासाठी १४ नोव्हेंबरची मुदतवाढ दिली. कर आणि अन्य देयके भरण्यासाठी भंडारा जिल्हावासीयांनी गर्दी केली. गृहकर, मालमत्ताकर, पाणीपट्टीकर, बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याचे सांगितले. १२ नोव्हेबरपर्यंत ३३ लाख, १३ नोव्हेंबरपर्यंत ५१ आणि आज १४ नोव्हेंबरपर्यंत ६६ लाख रूपये नगर परिषद, नगर पंचायतीच्या तिजोरीत जमा झाले. (शहर प्रतिनिधी)
तुमसरात १३.३४ लाखांची वसुली
तुमसर : ५०० व १००० रूपयांच्या चलनी नोटा बंद झाल्यानंतर तुमसर नगर परीषदेत नागरिकांनी आतापर्यंत १३,३४,९९२ लक्ष मालमत्ता कर जमा केले. यापूर्वी नगर परिषदेने गृहकराची विक्रमी वसुली केली होती. सध्या ९५ टक्के गृहकराची वसुली झाली आहे. परंतु नोटा बंदमुळे नगर परिषदेला अच्छे दिन आले आहे.
तुमसर नगर परिषद ‘ब’ दर्जाची आहे. ५०० व १००० च्या नोटा बंदपूर्वी गृहकराची वसुली करण्यात आली होती. परंतु चलनी नोटा बंद झाल्यामुळे गृहकराची १०० टक्के वसुली होण्याची शक्यता आहे. चलनातील जुन्या नोटा कर म्हणून भरल्या जाऊ शकतात, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बँकेत जुन्या नोटा रांगेत लागून जमा करण्यापेक्षा नगर परिषदेला गृह कर देण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. जे कर मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या घरी वारंवार जावे लागत होते. त्या नागरिकांनी स्वत:हून रांगा लावत नगर परिषदेत कर जमा केला. ( तालुका प्रतिनिधी)