जिल्ह्यातील ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:37 AM2019-04-26T00:37:16+5:302019-04-26T00:37:51+5:30
तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृती आराखड्यातील उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही तर मे महिन्यात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पाणी टंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. तलाव, बोडीतील जलस्तर घटल्याने पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. भूगर्भातील जलपातळी तापत्या उन्हाने खालावत असल्याने विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही कोरडे पडत चालले आहे. जिल्ह्यातील नदीचे पात्र वाळवंट झाले असून चुलबंदसह विविध नद्या कोरड्या पडल्या आहेत. नदीतीरावरील गावासोबतच जिल्ह्यातील तब्बल ६७९ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे.
जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. १ जानेवारी ते ३० जून पर्यंत १५५५ उपाययोजना या कृती आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. त्यात ४३१ गावात ५४१ नवीन विंधन विहिरी घेणे, ११२ गावात ११७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १२१ गावात ४४६ विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती तर २७५ गावात विहिरी खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे.
यावर १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत ५२ गावातील ६२ नवीन विंधन विहिरींसाठी ७२ लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तर विंधन विहिर विशेष दुरुस्तीसाठी १९० गावांमध्ये ३८ लाख ३५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. १ कोटी १० लाख ४६ हजार रुपये एप्रिल महिन्यात पाणी टंचाईच्या कामांवर खर्च झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. मात्र नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि विहिरीतील गाळ काढण्याची उपाययोजना मात्र शून्य आहे.
जलस्तर एक मीटर खाली
जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असून सरासरी एक मीटर खाली पाणी पातळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे गावातील विहिरींची पातळी खालावली असून हातपंपही कोरडे पडत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी जलस्तर खालीखाली जात आहे.