६८,८२० हेक्टर शेतजमीन पडीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 09:38 PM2017-09-03T21:38:35+5:302017-09-03T21:38:57+5:30
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पºहे करपले, तर, रोवणी केलेल्या शेतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चक्रव्यूहात अडकला आहे.
जिल्ह्यात दोन लाख ८ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप पिकासाठी निर्धारीत करण्यात आले होते. आतापर्यंत केवळ ६०.०३ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार १३६ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.७६ एवढी आहे. जुलै महिन्यात एकदा झालेल्या दमदार पावसामुळे शेतकºयांनी ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीवर अस्मानी संकट असून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली तर पºह्यांचा कालावधी दोन महिन्यांपर्यंत पोहचला आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी काही प्रमाणात रोवणी केली. मात्र आता वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्यांनाही धानाला पाणी देणे शक्य होत नाही. सद्यस्थितीला शेतकºयांची अवस्था बिकट आहे. यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकºयांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पावसाळा संपत असातानाही आलेल्या नाही.
पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ८२ हजार ७६२ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. ३० आॅगस्ट २०१७ पर्यंत केवळ १ लाख १९ हजार २६७ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. अर्धापेक्षा अधिक पावसाळा निघून गेला असून सप्टेंबर महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहेत.
९४ दिवसांत ६७ टक्के पाऊस
भंडारा जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१६ मध्ये २ सप्टेंबरपर्यंत ७१२ मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा २ सप्टेंबरपर्यंत ७१७ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा ५ मिमीने अधिक असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
दुष्काळग्रस्त घोषित करा
यंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकºयांनी रोवणी केली, त्यांचे रोवणीही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा विविध पक्ष, संघटनांनी दिला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकºयांना हवे तसे उत्पन्न येण्याची शक्यता नाही.
- प्रेमसागर गणविर,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस,भंडारा