साखरा पहाडी घाटावर ७० ब्रास रेतीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:53+5:302021-03-18T04:35:53+5:30
दिघोरी (मोठी) : जिल्ह्यात सर्वत्र रेती तस्करीला उधाण आले असून तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन ठेवला आहे. लाखांदूर ...
दिघोरी (मोठी) : जिल्ह्यात सर्वत्र रेती तस्करीला उधाण आले असून तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन ठेवला आहे. लाखांदूर महसूल विभागाने टाकलेल्या धाडीत साखरा पहाडी घाटावर तब्बल ७० ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. चुलबंद नदीपात्रातून मोठ्या प्रमाणार रेतीचा उपसा केला जात आहे. अनेक जण या व्यवसायात गुंतले आहेत. दिघोरी मोठी लगत असलेल्या साखरा पहाडी नदीघाटावर मोठ्या प्रमाणात रेती साठा असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यावरुन लाखांदुरचे नायब तहसीलदार एन.टी. पातोडे आणि दिघोरीचे तलाठी मयूर पाटील यांनी बुधवारी धाड मारली. त्यावेळी तेथे ७० ब्रास रेती साठा आढळुन आला. तावशी साझा क्रमांक ७ अंतर्गत येत असलेल्या साखरा पहाडीजवळ गट क्रमांक १५१ मध्ये हा रेतीसाठा आढळुन आला. महसूल विभागाने जप्तीची कारवाई केली. मात्र हा रेतीसाठा कुणाचा हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात दिघोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सायंकाळी जेसीबी व टिप्परच्या मदतीने रेती उचलुन नेण्यात आली. या कारवाईने तालुक्यातील रेतीमाफियांचे धाबे दणाणले असुन नेमकी रेती कुणाची याबाबत चर्चा आहे.